महाराष्ट्रासाठी सरतं २०२२ हे वर्ष प्रचंड राजकीय उलथापालथ घडवणारं राहिलं. याच वर्षात शिवसेनेत बंडखोरी झाली आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राज्यात नवी राजकीय समीकरणं तयार करणारं महाविकासआघाडीचं सरकार कोसळलं. इतकंच नाही, तर आश्चर्यकारकपणे मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे गेलं आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. मात्र, दुसरीकडे राजकीय कुरघोड्या आणि भ्रष्टाचारांच्या आरोपातून अनेक राजकीय नेत्यांना तुरुंगातही जावं लागलं. या पार्श्वभूमीवर नव्या वर्षाचं स्वागत करतानाच सरत्या २०२२ या वर्षात कोणत्या दिग्गज राजकीय नेत्यांना तुरुंगात जावं लागलं त्याचा हा आढावा…
१. नवाब मलिक
ठाकरे सरकारमधील तत्कालीन कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक नेते नवाब मलिक यांना ईडी सरकारने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याच्या आणि मनी लाँडरिंगप्रकरणात २४ फेब्रुवारीला अटक केली. त्यानंतर आतापर्यंत मलिक तुरुंगातच आहेत. मलिकांनी तुरुंगातून बाहेर येण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. मात्र, अद्याप त्यांची जामिनाची मागणी न्यायालयाकडून मंजूर झालेली नाही.
२. संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही ईडीने जुलै २०२२ मध्ये मनी लाँडरिंगच्या प्रकरणातच अटक केली. हे प्रकरण मुंबईतील पत्रा चाळ घोटाळ्याशी संबंधित होतं. तीन महिने तुरुंगात राहिल्यानंतर अखेर नोव्हेंबर २०२२ मध्ये संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला. आता ते जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत.
३. जितेंद्र आव्हाड
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील एका मॉलमध्ये मारहाणप्रकरणी वर्तनगर पोलिसांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये अटक केली. या प्रकरणात त्यांना सुरुवातीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. मात्र, नंतर त्यांना जामीन मिळाला आणि ते तुरुंगाबाहेर आले.
४. नितेश राणे
भाजपा आमदार नितेश राणे यांना खूनाचा प्रयत्न केल्याच्या एका प्रकरणात फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक झाली. त्यानंतर त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. नंतर त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीही सुनावण्यात आली. नितेश राणेंना या प्रकरणात एकूण १० दिवस तुरुंगात राहावं लागलं. त्यानंतर त्यांना या प्रकरणी जामीन मिळाला.
५. नवनीत राणा व ६. रवी राणा
अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना २३ एप्रिल २०२२ रोजी उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर आंदोलन आणि जमावाला भडकावण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यानंतर ४ मे २०२२ रोजी या प्रकरणात त्यांना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला.