सोलापूर : सोलापूरकरांच्या दृष्टीने आत्मीयतेची असलेला सोलापूर-मुंबई प्रवासी विमानसेवा सुरू करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळला असताना, सोलापूरकरांसाठी गोवा विमानसेवा येत्या २६ मेपासून सुरू होणार आहे. ही विमानसेवा सुरू करण्यासाठी ‘फ्लाय ९१’ ही प्रवासी विमान वाहतूक कंपनी सज्ज झाली आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. मात्र या विमानसेवेसाठी उपलब्ध होणारे विमान किती आसन क्षमतेचे राहणार आणि आठवड्यातून किती दिवस ती सुरू असणार, याचा तपशील उपलब्ध झाला नाही.
सोलापूरकरांना मुंबई प्रवासी विमानसेवेची वर्षानुवर्षांपासून प्रतीक्षा आहे. यापूर्वी २००८ साली सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पुढाकाराने किंगफिशर कंपनीने मुंबई- सोलापूर-मुंबई प्रवासी विमानसेवा सुरू केली होती. परंतु तांत्रिक कारण पुढे करीत ती बंद केली.दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे सत्तेत असताना त्यांनी शहरानजीक बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय कार्गो विमानतळ उभारण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून मंजुरी मिळविली होती. त्यानुसार सुमारे दोन हजार एकर जमिनीचे संपादनही झाले होते. परंतु गेल्या अकरा वर्षांत या विमानतळ उभारणीचा प्रश्न वन खात्याची अडचण असल्याचे कारण पुढे करून प्रलंबित ठेवण्यात आला आहे.
दुसरीकडे होटगी रस्त्यावरील जुन्या विमानतळालगत विमानसेवेसाठी अडथळा ठरलेली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची उंच चिमणी पाडून येत्या जून महिन्यात दोन वर्षे उलटत आहेत. मात्र तरीही या ना त्या कारणाने विमानसेवेला मुहूर्त लागत नाही. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नूतनीकरण झालेल्या सोलापूर विमानतळाचे लोकार्पण केले होते. त्यानंतर विमानसेवेसाठी सोलापूरकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी व मंत्र्यांनी आश्वासनापलीकडे काहीही दिले नाही. या पार्श्वभूमीवर दुसरीकडे सोलापूरच्या तुलनेने पिछाडीवर असलेल्या अमरावतीसारख्या शहरासाठी मुंबई विमानसेवा सुरू झाली आहे. इकडे सोलापूर विमानसेवेचा पत्ता नसताना गोवा विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने घेतला आहे. मुंबई विमानसेवेसाठी यापूर्वी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असता, ‘स्टार एअर’ कंपनीने ही जबाबदारी घेतली होती. परंतु पुन्हा तांत्रिक अडचणीमुळे मुंबई विमानसेवेचा प्रश्न तूर्तास मागे पडला आहे. मुंबई आणि हैदराबादसाठी सोलापूरहून विमानसेवा सुरू करण्याची मागणी आहे.