लोकसभा निवडणुकीतील आर्थिक व इतर स्वरुपातील अवैध प्रकार रोखण्यासाठी जिल्ह्य़ातील सर्व विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी ३ भरारी पथकांची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिली. यासंदर्भातील तक्रारी नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत.
निवडणूक काळात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कोणी जर पैसे व इतर स्वरुपात प्रलोभन दाखवत असेल, स्वीकारत असेल, शाररिक इजा करण्याचे अथवा तीव्र स्वरुपाचे भय दाखवत असेल भारतीय दंड संहितेत यासाठी गुन्ह्य़ाची तरतूद करण्यात आलेली आहे. दोषींना आर्थिक दंड व कारवास किंवा दोन्ही प्रकारच्या शिक्षेची तरतूद आहे. भरारी पथकांची स्थापना अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यासाठी करण्यात आली आहे. नागरिकांनी कोणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रलोभन दाखवत असेल, धमकावत असेल किंवा भय दाखवत असेल तर त्यांनी टोल फ्री क्रमांकावर तक्रार करायची आहे.
दरम्यान निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार रविवारी जिल्ह्य़ात राबवलेल्या मतदार नोंदणी अभियानात ८ हजार ७७१ अर्ज मतदार यादीत नाव नोंदणीसाठी दाखल करण्यात आले. मतदार नोंदणी दि. २६ मार्चपर्यंत सुरु राहणार असली तरी प्रत्यक्षात दि. १९ पर्यंत भरुन दिलेल्या अर्जाचीच नोंदणी यादीत होणार असल्याचे कवडे यांनी सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव उपस्थित होते. निवडणूक आचारसंहितेचे साहित्य छपाईबाबत असलेल्या बंधनांची माहिती देण्यासाठी जिल्ह्य़ातील सर्व मुद्रकांची बैठक मंगळवारी सकाळी १२ वाजता कवडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
टोल फ्री क्रमांक
– आर्थिक व इतर स्वरुपांच्या तक्रारी नोंदवणे- १८००२३३३०४४
– मतदार यादीत नाव शोधणे, मतदारयादीतील अडचणी -१८००२३३३०३३

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा