गेल्या तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे सांगलीत कृष्णा नदीकाठी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने आज (बुधवार) सकाळी कृष्णा नदीतील पाण्याची पातळी 37 फुटांवर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे कर्नाळ रोड, दत्तनगर, सूर्यवंशी प्लॉट या भागांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. याचबरोबर सूर्यवंशी प्लॉटमधील नागरिकांचे महापालिका शाळा नंबर २५ मध्ये स्थलांतर सुरू आहे. दरम्यान, नदी काठी असलेल्या दत्तनगर भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन सांगली महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

नदीकाठी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सर्तकच्या सुचना देण्यात आल्या असून मध्यरात्रीपासून सांगली महापालिका यंत्रणा, अग्निशमन विभाग, आपत्ती नियंत्रण कक्षाने पूर भागात मदतकार्य सुरू केले आहे. तसेच ज्या भागांमध्ये पाणी येण्यास सुरूवात झाली आहे, त्या ठिकाणच्या नागरिकांचे तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश आयुक्त नितीन कापडणीस यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना महापालिकेच्या शाळांमध्ये वास्तव्य करण्यास देण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहे.

दरम्यान, पाणी पातळी वाढत असल्याने नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, यासाठी महापालिका यंत्रणा मदत करेल असे आश्वासनही कापडणीस यांनी दिले आहे. मध्यरात्रीपासून पूर सदृश्य भागातील 100 पेक्षा अधिक नागरिकांना महापालिकेच्या अग्निशमन आणि आरोग्य विभागाच्या यंत्रणेकच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अजूनही काही भागात पाणी येण्याची शक्यता असल्याने त्या भागातील नागरिकांनाही स्थलांतरित करण्यासाठी मनपाकडून मदत केली जात आहे.

Story img Loader