* आपटा गावाचा संपर्क तुटला   
* येत्या २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा
रायगड जिल्ह्य़ाला मुसळधार पावसाने अक्षरश: धुऊन काढले आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात सरासरी १७१.२६ मिमी एवढय़ा विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे पाताळगंगा नदीला पूर आला, त्यामुळे आपटा गावाचा संपर्क तुटला. तर खोपोली शिळफाटा येथे पाणी साचल्याने मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक द्रुतगती मार्गावर वळवण्यात आली. दरम्यान येत्या २४ तासांत उत्तर कोकणातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे, तर जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
   रोहा तालुक्यातील निडी येथे एका घरावर दरड कोसळली आहे. त्यामुळे या परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी तातडीने स्थलांतरित करण्यात आले आहे, तर माणगाव-म्हसळा रस्त्यावर साई गावाजवळ झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर ही वाहतूक सुरू करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
जिल्ह्य़ातील पेण, कर्जत, खालापूर, तळा तालुक्यांना या पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. पेण येथे तब्बल २६२ मिलीमीटर, तर माथेरान येथे २१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे पाताळगंगा नदीला पूर आला आहे. खारपाडा ते रसायनी मार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. आपटा गावाला तीनही बाजूंनी पुराचा वेढा बसला, त्यामुळे गावाचा संपर्क तुटला. आपटा खिंडीत चार ते पाच फूट पाणी शिरले, तर कोळीवाडा, मोहल्ला आणि बस स्टॅंड परिसरातही पुराचे पाणी शिरले, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.  
 मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली शिळफाटा येथे पाणी साचल्याने महामार्गावरील वाहतूक द्रुतगती मार्गावर वळवावी लागली. खोपोली शहरातही ठिकठिकाणी पाणी साचले होते. महाडमधील सावित्री, रोह्य़ातील कुंडलिका आणि नागोठण्याच्या अंबा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. भरतीच्या वेळेस पावसाचा जोर कायम राहिला तर या तीनही शहरांना पुराचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.
 गेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात सरासरी १७१.२६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात अलिबागमध्ये ९९.८ मिमी, पेणमध्ये २६२.२ मिमी, मुरुडमध्ये १२७ मिमी, पनवेलमध्ये १४९ मिमी, उरणमध्ये २३१ मिमी, कर्जतमध्ये १९२ मिमी, खालापूरमध्ये १९८ मिमी, माणगावमध्ये १४३ मिमी, रोहा येथे १५९ मिमी, सुधागड पाली येथे ११८ मिमी, तळा येथे १९८ मिमी, महाड येथे १५८ मिमी, पोलादपूर येथे १३६ मिमी, म्हसळा येथे १७१ मिमी, श्रीवर्धन येथे १८८ मिमी, तर माथेरान येथे २१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
संततधार पावसाने जिल्ह्य़ातील नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभ राहिले आहे. मुरुड तालुक्यातील विहुर येथील रस्ता खचला आहे, त्यामुळे या रस्त्यावरील पुलाचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. महाड नगरपालिकेने काकरतळे ते कोटेश्वरी तळे यादरम्यान नव्याने बांधलेल्या नाल्याच्या भिंतीचे बांधकामही कोसळले आहे, त्यामुळे महाड नगरपालिकेने केलेल्या कामातील अनागोंदी कारभार पहिल्याच पावसात समोर आला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने बळीराजा चांगलाच धास्तावला आहे.
    दरम्यान येत्या २४ तासांत उत्तर कोकणातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. समुद्रकिनाऱ्यावर ताशी ४० ते ६० किलोमीटरच्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने समुद्र खवळलेला असणार आहे, त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा