लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
अलिबाग : रविवारी रात्री झालेल्या पावसाचा रायगडला तडाखा बसला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अलिबाग आणि मुरूड तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे.
शनिवार पाठोपाठ रविवारीही रायगड जिल्ह्यात पावसाचे रौद्र रूप पहायला मिळाले. शनिवारी कर्जत, खोपोली, पनवेल, सुधागड, रोहा तालुक्यांना पावसाचा तडाखा बसला होता. रविवारी महाड, पोलादपूर, अलिबाग, श्रीवर्धनमध्ये अतिजोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ठिकठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अलिबाग तालुक्यात रविवारी रात्री साडेअकरानंतर विजांच्या कडकडाटासह पावासाला सुरूवात झाली, पहाटे तीन वाजेपर्यंत तुफान पाऊस सुरू होता. त्यामुळे अलिबाग शहरासह, चेंढरे, नेऊली, खंडाळे परिसर जलमय झाले होते. मध्यरात्री अनेक घरांमधे पावसाचे पाणी शिरले होते. त्यामुळे रहिवाश्यांची तारांबळ उडाली होती. घरातील सामानाला सुरक्षित ठेवण्यासाठी धावपळ सुरू होती. अलिबाग तालुक्यात रामराज, चरी, सारळ, किहीम, चौल, पोयनाड परिमंडळात अतिवृष्टी झाली.
आणखी वाचा-Video : किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. कुंडलिका नदीने शनिवारी रात्री दहा वाजता इशारा पातळी ओलांडली होती. त्यामुळे नदी किनाऱ्यांवरील गावांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले होते. दरम्यान अलिबाग आणि मुरुड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. पण हे आदेश येण्यास उशीर झाल्याने सकाळच्या सत्रातील शाळा नियमित सुरू होत्या.
तळा २८७, म्हसळा २७३, मुरुड २५५, अलिबाग १७०, श्रीवर्धन १३१, माणगाव ९२, रोहा ९३, पनवेल ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात सरासरी १०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.