मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील भंगसाळ व पीठढवळ या दोन नद्या, या अतिवृष्टीच्या काळात पूर येऊन वाहतूक ठप्प होते. त्यावर उपाययोजना स्वातंत्र्यानंतर करण्यात आली नाही, तसेच जिल्हा आपत्ती यंत्रणेनेही त्याची साधी दखलही घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अतिवृष्टीच्या काळात आपत्ती येऊ शकणाऱ्या या दोन्ही नद्यांना दरवर्षी पूर येतो.
जिल्हाधिकारी विक्रमकुमार असताना केंद्राच्या निधीतून या दोन्ही पुलांच्या उंची वाढीसाठी अनुदान मंजूर झाल्याचे म्हटले होते. पण त्यानंतरच्या सुमारे दोन वर्षांच्या काळात प्रगती झाली नाही. त्याहीपेक्षा पावसाळ्याच्या काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने दर्शकफलक किंवा रिफ्लेक्टर लावणे अपेक्षित आहे.
‘दरवर्षी येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणेच दरवर्षी भंगसाळ व पीठढवळ या मुंबई-गोवा महामार्गावरील नद्यांना महापूर येऊन वाहतुकीचा खेळखंडोबा होतो. वाहतूक दूरवरच्या मार्गावरून फिरवली जाते पण प्रवास करणाऱ्या सर्वच वाहनधारकांना रस्ते माहीत नसल्याने या पुलावरून पाण्याची पातळी खाली जाईपर्यंत लोक थांबतात. पाणी रात्रीच्या वेळीही अचानक येते.
जिल्ह्य़ातील २३ गावे पूरबाधित म्हणून घोषित करण्यात आली आहेत. शिवाय आंबोली, करुळसह सहा ठिकाणी दरडप्रणवग्रस्त भाग म्हणून काळजी घेतली जाणार आहे. त्यात भंगसाळ व पीठढवळ नदीला येणाऱ्या महापुराची जिल्हा आपत्कालीन यंत्रणेने साधी नोंदही घेतली नसल्याचे बोलले जात आहे.
तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील शोध व बचावपथके नियुक्त करण्यात आली आहेत. शिवाय पूरस्थिती उद्भवल्यास फायबर बोटी, लाइफ जॅकेट उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जिल्ह्य़ात आपत्ती यंत्रणेने लाइफ बोट २३०, लाइफ जॅकेट २३०, अ‍ॅल्युनियमच्या शिडय़ा १०, स्ट्रेचर १०, मशीन करवत तीन, टॉर्च १६ उपलब्ध करून दिले आहेत.
जिल्ह्य़ातील २३ गावे पूरबाधित म्हणून घोषित करण्यात आली आहेत. आंबोली, करुळ, घाटासह विजयदुर्ग-पडेल, कुणकेश्वर, आचरा-मालवण रेवस-रेवंडी रस्ता, देवगड-निपाणी रस्ता, गगनबावडा, भुईबावडा, खारेपाटण रस्ता, पडेल-वाघोटन, तळेरे-गगनबावडा अशी सहा ठिकाणे दरडप्रवणग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
जिल्हा आपत्कालीन यंत्रणेने प्रशिक्षणही सर्व संबंधितांना दिल्याचे सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा