रत्नागिरी जिल्ह्यात सलग दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. शनिवार मध्यरात्रीपासून पावसाचा आणखी जोर वाढल्याने लांजा तालुक्यातील मुचकुंदी, राजापूरमधील काजळी नदी, चिपळूणमधील वाशिष्टी नदी, खेडमधील जगबुडी नदी आणि संगमेश्वरमधील शास्त्री या नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर शहर आणि रत्नागिरीतील चांदेराई बाजार पेठेत पाणी भरल्याने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्याला सलग दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेड, संगमेश्वर, चिपळूण, राजापुर, चांदेराई बाजार पेठेत पाणी भरल्याने व्यापाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. राजापुरमधील जवाहर चौकात पुन्हा पाणी भरले आहे. शहरातील जवाहर चौकासह वरचीपेठ मछिमार्केट कोंड्येतळ आधी भागांना पुराच्या पाण्याचा विळखा पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर एसटी प्रशासनाने जवाहर चौकातली वाहतूक बंद केल्याने ग्रामीण जनतेला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. शीळ गोठणे रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग बंद करण्यात आला. तर रत्नागिरीतील चांदेराई बाजार पेठेत पाणी शिरण्याल्याने दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

हेही वाचा – राज्यकर्ते आरक्षणाच्या प्रश्नांवर गंभीर नाहीत – खासदार सुप्रिया सुळे

राजापुर बाजार परिसरात चारवेळा पाणी भरल्याने येथील आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. तर लांजा येथे कोसळणाऱ्या पावसामुळे मुचकुंदी नदीला पूर आल्याने या पुराचे पाणी चांदेराईच्या बाजारपेठेत शिरले. यामुळे जवळपासच्या गावांचा संपर्क तुटला आहे. चांदेराई गावाजवळील चिंद्रवली नीरखुणे गावातील रस्ता खचला आहे. काजळी नदीला आलेल्या पुरामुळे मुंबई गोवा महामार्गावरील अंजणारी पूल वहातुकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. लांजा तालुक्यातील नावेरी आणि बेनी या नद्याही ओसंडून वहात आहेत. संगमेश्वरमधील शास्त्री नदीच्याही पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने येथील पुराचे पाणी बाजार पेठेत शिरण्यास सुरुवात झाली आहे.

संगमेश्वर परिसरातील भागात देखील पावसाने चांगलाच जोर धरला आहे. चिपळूण येथील वाशिष्टी नदीच्या पाणी पातळीत वाढ होवू लागल्याने येथेही पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चिपळूण बाजार पेठेतील काही सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा असाच राहिल्यास कोयना धरणातून सोडण्यात आल्यास लवकरच पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली असून या नदीचे पाणी खेड बाजारात शिरले आहे. जिल्ह्यातील जगबुडी नदी धोका पातळीवर वहात आहे. तर काजळी नदी, शास्त्री नदी, कोंदवली नदी आणि मुचकुंदी या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.

हेही वाचा – सांगली : विक्रीसाठी आणलेल्या १० तलवारी जप्त, तरुणाला अटक

संततधार पावसामुळे रविवारी सकाळी मंडणगड शहरातील गांधी चौकातील पुलाजवळील भराव खचल्याने पुलावरून जाणारी वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली आहे. दरम्यान तालुक्यात दोन दिवस संततधार बरसत असलेल्या पावसामुळे भारजा नदीला पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. भोळवली धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यावरुन व विमोचकातून विसर्ग सुरू आहे. दोन दिवसाच्या संततधार अतिवृष्टीने एकंदरीत तालुक्यातील जनजीवन विस्कळीत करुन टाकले आहे. दापोली तालुक्यातील बामणघर गावातील हसमुख चाकले यांच्या घराचे अंशतः नुकसान झाले. या घराचे एकोणीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याची पंचनाम्यात नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील सावित्री भारजा, निवळी या मुख्य नद्यांसह लहान मोठे ओढे दुथडी भरुन वहात आहेत. याचबरोबर चिंचाळी व भोळवली ही दोन धरणे पूर्णपणे भरली असून अन्य धरणे पंच्यानव टक्क्याहून अधिक भरली आहेत. मांदिवली व चिंचघरला जोडणाऱ्या पुलासह तालुक्यातील अनेक ठिकाणांच्या मोरी व कॉजवेवरुन पाणी जाऊन अनेक गावांचा संपर्क तुटला.

जिल्ह्यात एक जुनपासून आतापर्यंत सरासरी दोन हजार आठपेक्षा जास्त मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात रविवारी दिवसभरात मंडणगड तालुक्यात १३९.८० मिमी सरासरी जास्त तर चिपळूण तालुक्यात ७६.७० मिमी सरासरी एवढ्या कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गतवर्षी २१ जुलैपर्यंत १४५३.७४ मिली एवढ्या सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर बघता रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने सर्वत्र सतर्कतेचे आदेश दिले आहेत. सर्व आपत्कालीन व्यवस्थांना पूरस्थितीचा सामना करण्यास तयार राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flood situation again in ratnagiri district due to heavy rain ssb
Show comments