मुसळधार पाऊस आणि गोसीखुर्द तथा मेडीगट्टा धरणाचे सर्व दारे उघडल्याने गडचिरोलीत पूर आला आहे. परिणामी, जिल्ह्यातील २० प्रमुख मार्ग बंद आहेत. अनेक रस्ते, पूल व रपटे वाहून गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती नद्यांची पाण्याची पातळी वाढत असल्याने आणि गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढविण्यात येणार असल्याने नदी काठावरील गावांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. चामोर्शी ते गडचिरोली आणि आरमोरी ते गडचिरोली मार्ग पूर्णपणे बदं आहेत. आलापल्ली ते भामरागड मार्ग पर्लकोटा नदीला पूर आल्याने बंद आहे. बोरमपल्ली ते नेमडा, ता. सिरोंचा येथील नाल्यावरील रपटे वाहून गेल्यामुळे हा मार्ग पूर्णत: बंद आहे.
चंद्रपूर : पुरात अडकलेले २२ वाहनचालक सुखरूप; ५९१ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले
सिरोंचा तालुक्यातील झेंडा, दर्चेवाडा, बोंड्रा, मोयाबिन पेठा, विठ्ठलराव पेठा, परसेवाडा, विठ्ठलराव चेक, सिकेला – नाका, रेगुंठा या गावाचे मार्ग बंद (संपर्क तुटलेला) आहे. कंबालपेठा ते टेकडा चेक, ता. सिरोंचा येथील नाल्यावरील रपटे वाहून गेल्यामुळे सदरचे मार्ग पूर्णत: बंद आहेत. कुंभी ते चांदाळा, ता. गडचिरोली मार्ग, माडेमुल-रानमूल-चांदाळा, ता. गडचिरोली मार्ग पूर्णतः बंद आहेत. लगाम ते आलापल्ली, ता. अहेरी मार्ग, मुत्तापूर नाल्यावरुन एका बाजून वाहतूक सुरू आहे. याशिवाय ग्रामीण भागातील लहान-मोठ्या मार्गांसह चामोर्शी – गडचिरोली मार्ग बंद आहे.