अलिबाग– शनिवारी रात्रभर सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली, त्यामुळे अंबा, पाताळगंगा नद्यांनी धोका पातळी ओलांडली, त्यामुळे नागोठणे आणि खापोली लगतच्या परिसराला पुराचा तडाखा बसला. पनवेल तालुक्यातील आपटा येथेही पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ३०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. रविवारी सकाळी आठवाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात अलिबाग, मुरुड, सुधागड, तळा आणि माथेरान येथे २०० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली तर उर्वरीत सर्व तालुक्यांत १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्या, ओढे यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली होती. रविवारी सकाळी आठ वाजता कुंडलिका, पाताळगंगा आणि अंबा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. नऊ वाजेच्या सुमारास अंबा नदीने सर्वात आधी धोका पातळी ओलांडली. त्यामुळे नागोठणे शहराला पूराचा तडाखा बसला, एसटीस्टँड परीसर, कोळीवाडा परिसर, मरिआई मंदीरपरीसरात एक ते दोन फुट पाणी भरले होते. बाजारपेठ परिसरातील सखल भागात पाणी शिरले होते.

हेही वाचा – सातारा : पश्चिम घाट क्षेत्रात तुफान पाऊस; कोयनेची जलआवक पाचपट वाढली

पाताळगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पनवेल तालुक्यातील आपटा परीसरात सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली. आपटा खारपाडा आणि आपटा पनवेल मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली. उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नेरळ दहीवली पूल पाण्याखाली गेला होता. वाकण पाली मार्गावरील पूलावर अंबा नदीचे पाणी आल्याने वाहतूक थांबवण्यात आली. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर कोलते गावाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तर मुंबई पूणे दृतगती मार्गावर अमृतांजन ब्रिज परिसरात पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.

खालापूर जवळील सावरोली पूलावरून पाताळगंगा नदीचे पाणी वाहू लागल्याने यापूलावरची वाहतूक थांबवण्यात आली होती. खोपोली शहरातील सखल भागात पाणी शिरले होते. अडकलेल्या नागरिकांना बचाव पथकांनी बाहेर काढले. खालापूरमधील मिळगाव पूलही पाण्याखाली गेल्याने पलीकडील गावांचा संपर्क तुटला होता. पोलादपूर तालुक्यातील चिरेखिंड ते अंबेमाची मार्गावर दरड कोसळली. रोहा शहरालगत कुंडलिका नदी इशारा पातळीवर वाहत असल्याने नगर पालिकेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

हेही वाचा – साताऱ्याची ‘लाडकी बहीण’ ऑनलाईन नोंदणीत सर्वप्रथम

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे २ कच्च्या घरांचे पूर्णतः नुकसान झाले. ७२ पक्क्या घरांचे अंशतः नुकसान झाले. २२ गोठेही बाधित झाले. पोलादपूर तालुक्यातील सहा गावातील, पेण आणि मुरुड प्रत्येकी एक अशा एकूण आठ गावातील नागरीकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले होते. यात १०२ कुटुंबातील ३३६ जणांचा समावेश होता.

आंबा, कुंडलिका, पाताळगंगा नद्या दिवसभर इशारा पातळीवर

अंबा नदीची इशारा पातळी ८ मीटर आहे. तर धोका पातळी ९ मीटर आहे. ती दिवसभर धोका पातळीवरून वाहत होती. कुंडलिका नदीची इशारा पातळी २३ मीटर आहे. तर धोका पातळी २३.९५ मीटर आहे. ती दिवसभर इशारा पातळीवरून वाहत होती. पाताळगंगा नदीची इशारा पातळी २०.५० मीटर आहे. तर धोका पातळी २१.५२ मीटर आहे. ती धोका पातळी जवळ होती. सावित्री नदीने इशारा पातळी ओलांडली असल्याने महाड परिसरालाही पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flood situation in raigad due to heavy rain nagothane apta khopoli area affected by flood ssb