विदर्भातील अतिवृष्टीमुळे पूरस्थितीत खंड पडलेला नसून लाखो हेक्टरवरील पिकांची संपूर्ण नासाडी झाली आहे. अनेक गावे अजूनही पुराच्या वेढय़ात असून काही जिल्ह्य़ांमधील रेल्वे आणि बस वाहतूक अजूनही पूर्ववत झालेली नाही. शासकीय यंत्रणेचे हात अद्यापही न पोहोचलेली असंख्य पूरग्रस्त गावे मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. विदर्भातील आमदारांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विधिमंडळात केल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण येत्या शनिवारी आणि रविवारी विदर्भ दौऱ्यावर येणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला; परंतु अद्याप ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील पाऊस बाकी असल्याने तिबार पेरणी करून जोखीम पत्करण्याची शेतक ऱ्यांची तयारी नाही.
गेल्या दोन आठवडय़ांपासून विदर्भात ही भयंकर परिस्थिती उद्भवलेली आहे. बहुतांश जलाशयांमध्ये १०० टक्के पाणी साठल्याने अनेक धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. धरणांचे दरवाजे उघडण्यात आल्याने शेतांमध्ये पाणी साचले असून नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. हजारो गावकरी बेघर झाले असून मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. धरणातील पाणी अचानक सोडण्यात आल्याने अनेक गावे जलमय झाली. याचा मोठा फटका गावकऱ्यांना बसला. गावकरी गावेच्या गावे सोडून सुरक्षित स्थळी आश्रयाला जात असले तरी त्यांची अन्नपाण्याची सोय करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.
धुवाधार पावसाने चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्य़ांचे सर्वाधिक नुकसान केले आहे. ग्रामीण भागातील शाळा ओस पडल्या असून सर्वेक्षणाचे काम ठप्प पडले आहे. बससेवा, रेल्वे वाहतूक सपशेल विस्कळीत झाल्यामुळे प्रवासी अडकले आहेत.
रस्त्यांवर पाणी साचलेले असल्याने अनेक बसेस पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या. आज वर्धा मार्गावरील नागपूर विभागातील सिंदी-तुळजापूर रेल्वे वाहतूक मध्य रेल्वेने कशीबशी सुरळीत केली. येणाऱ्या ४८ तासांत पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने लोकांमध्ये दहशत आहे. तलाव केव्हाही फुटण्याच्या भीतीपोटी गावकरी कच्चीबच्ची आणि हाती लागतील त्या वस्तूंसह सुरक्षित स्थळांकडे जाताना दिसतात.
गावेच्या गावे जलमय होण्यासारखी गंभीर परिस्थिती पाहता धरणातून पाणी सोडण्यापूर्वी गावातील पटवारी, ग्रामसेवक, तलाठी व अन्य कर्मचाऱ्यांना पूर्वसूचना देण्याची ताकीद जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. लोकांच्या घरातील चीजवस्तू वाहून गेल्याने खाण्याचे वांधे झाले आहेत. या लोकांसाठी अन्नाची पाकिटे पुरविण्याची कोणतीही व्यवस्था प्रशासनाकडे नाही. शेतीच्या एकंदर नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी तलाठी-तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या असल्या तरी दुबार आणि तिबार पेरणीचीही पिके वाहून जाऊन जमीन खरडल्याने त्याचा अदमास घेणे अत्यंत कठीण काम झाले आहे.

Story img Loader