कृष्णा-वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाटय़ाने धोक्याच्या रेषेकडे जाऊ लागली असून, सांगलीवाडीसह हरिपूर भागातील रहिवासी क्षेत्रात पुराचे पाणी शिरले आहे. संततधारेमुळे सांगलीच्या गुंठेवारीसह विस्तारित भागात रस्त्याअभावी नागरिकांची त्रेधा उडाली आहे.
शिराळा तालुक्यातील चांदोली धरणक्षेत्रात सलग ४ दिवस अतिवृष्टी सुरू असून, गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत शिराळय़ात ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. चांदोली धरणातील पाणीसाठा २४.९३ टीएमसी झाला असून धरण ७२ टक्के भरले आहे. वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाउस सुरू असल्याने नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. काखेमांगले पूल पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. वाळवा तालुक्यातील बोरगाव, नागठाणे हा कृष्णाकाठच्या गावातील संपर्काचे साधन असणारा पूलही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे शिरगावचा संपर्क तुटला आहे. दुधगाव बंधारा पाण्याखाली गेल्याने कोल्हापूर-खोचीकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे.
हरिपूर, सांगलीवाडी परिसरात नदीकाठाला पाणी वाढल्याने रहिवासी क्षेत्रात नागरिकांची धावपळ उडाली आहे. काकानगर, श्यामरावनगर या भागात काळी माती असल्याने संततधारेने रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून काही ठिकाणी पावसाने तळे साचले आहे.
सांगलीतील आयर्वनि पुलाजवळ मुसळधार पावसाने पाण्याची पातळी २४ फुटांवर पोहोचली असून पाण्यात वाढ होत आहे. या ठिकाणी ३५ फूट पाण्याची पातळी गेली तर कृष्णेचे पाणी रहिवासी क्षेत्रात शिरू शकते. त्यामुळे कृष्णाकाठच्या लोकांना स्थलांतरित करण्यासाठी प्रशासन सज्ज ठेवण्यात आले आहे.
पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी ८ वाजता सांगली येथे २७.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मिरज ३८.२०, इस्लामपूर ६१, पलूस २५, तासगाव ३७, शिराळा ७६, विटा २६, कवठेमहांकाळ ४८, कडेगाव ४२, जत १४ आणि आटपाडी २ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गुरुवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली असून, नदीतील पाणीपातळी ओसरण्यास अद्याप दोन दिवसांचा अवधी लागेल असे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र नदीच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पाऊस सुरू असल्याने पाणी ओसरेलच याची खात्री देता येणार नाही.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा