दहा दिवसांच्या संततधार पावसामुळे या वर्षी ५ वर्षांत प्रथमच महाबळेश्वरचा प्रसिद्ध वेण्णा लेक दुथडी भरून वाहू लागला असून आज (बुधवार) भल्या पहाटे पाण्याने सांडवा ओलांडला. अथांग भरलेले वेण्णा लेक व सांडव्यावरून वाहणाऱ्या वेण्णाच्या जलधारांचे दृश्य अत्यंत मनोहारी दिसत असून आज त्याचा आनंद स्थानिकांसह अनेक पर्यटकांनी घेतला.
दरम्यान हवामान खात्याचा नोंदीनुसार १ जूनपासून आजपर्यंत येथे १३४०.२ मिमी पाऊस झाला. या वर्षी महाराष्ट्राची चेरापुंजी महाबलेश्वरमध्ये ३ जूनपासूनच मान्सून पावसाची बरसात सुरू झाली. ९ जूनपासून त्याने सलग बरसणे सुरू केले ते आजतागायत त्याची संततधार सुरू आहे. येथील हवामान खात्याच्या नोंदीनुसार ३ जून रोजी ४२.४ मिमी, ४ जून ४१ मिमी, ९ जून ५० मिमी, १० जून १४१.१ मिमी, ११ जून ९५.४ मिमी, १२ जून ३४.४ मिमी, १४ जून ४७.९ मिमी, १५ जून ९२.५ मिमी, १६जून २३०.६० मिमी, १७ जून २९० मिमी,१८ जून ११८.१ मिमी व १९ जून १०५.५ मिमी. तर १ जूनपासून अजपर्यंत येथे १३४०.२ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. दरम्यान गेले ५ वर्षांतील या नंदनवनातील मान्सूनची परिस्थिती पाहता ५ वर्षांत प्रथमच जून महिन्याच्या १० दिवसात सलग मुसळधार पाऊस पडून कमी वेळात येथील प्रसिद्ध वेण्णा लेक अथांगपणे भरून वाहू लागला. आज भल्या पहाटे जलधारांनी वेण्णा लेकचा सांडवा पार केला. त्याचे मनोहारी दृश्य पाहण्याचा आनंद स्थानिकांसह पर्यटकांनीही मोठय़ा संख्येने लुटला.

Story img Loader