शेतकऱ्यांचे नुकसान, लाखो लोक बेरोजगार
अशोक तुपे, लोकसत्ता
श्रीरामपूर : टाळेबंदीमुळे फुले विक्रीचा व्यवसायच बंद पडला असून, मंदिरातील व घरातल्या देवघरातील देवाला फुले मिळेनाशी झाली. किमान दोन महिने तो पूर्वपदावर येण्याची चिन्हे नाहीत. त्यातील लाखो लोकांचा रोजगार गेला. त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही फुलांचे खत करावे लागत असले तरी तेही खर्चीक आहे.
मानवी जीवनाशी, त्याच्या भावभावनांशी फुलांचे नाते आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या प्रवासात सुख-दु:खाच्या क्षणी त्याला व्यक्त होण्यासाठी फुलांची साथ लागते. टाळेबंदीमुळे फु लांची शेतीच अडचणीत आली. वाहतूक बंद झाल्याने फु लांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. टाळेबंदीमुळे फुलांचा व्यवसायच बंद पडला आहे.
राज्यात अॅस्टर, शेवंती, ग्लॅडीओलस, मोगरा, लिली, झेंडू, गुलाब, निशिगंध, गुलछडी, गलांडा आदी फुलांचे सुमारे चार हजार हेक्टर्स क्षेत्रांत उत्पादन घेतले जाते. पुणे जिल्ह्य़ात वडगाव मावळ, कुंजीरवाडी, खेड शिवापूर, यवत, लोणी काळभोर, वाई (सातारा), सासवड, झेंडेवाडी, सोरतापवाडी, कोल्हापूर, नगर जिल्ह्य़ातील सुपा, शिर्डी परिसरातील नांदुर्खी, कनकुरी, निघोज, सोनेवाडी आदी अनेक गावांतील शेतकरी फुलांची शेती करतात. राज्याच्या बहुतेक जिल्ह्य़ांत स्थानिक पातळीवरील फुलांची गरज स्थानिक शेतकरी भागवतात. स्टार अॅग्रो, एस. आर. अॅग्रोटेक, सोएश फ्लोरा, सारे पाटील, अशी अनेक कंपन्यांची फुलांची पॉलीहाऊसेस आहेत. त्यामध्ये जरबेरा, कार्नेशन, गुलाब ही फुले मुख्यत्वे घेतली जातात. मावळ भागात ३०० एकर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रात पॉलीहाऊस आहेत. राज्यात सुमारे एक हजार एकर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रात पॉलीहाऊस असून तेथे हायटेक पद्धतीने फुलशेती केली जाते. मावळातील फुले ही जपान, हॉलंड व दुबईला निर्यात होतात. आज फुले तोडून त्याचे खत करावे लागत आहे. जरी उत्पन्न मिळत नसले तरीदेखील खत, औषधे, पाणी व मजुरांचा खर्च सुरूच आहे. फूल उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
पुणे बाजार समितीच्या आवारात फुलांचा घाऊक व्यापार चालतो. १७० लहान-मोठे आडते आहेत. तर पाचशे ते सातशे घाऊक व्यापारी आहेत. पुण्यात फुलांची दोन हजार दुकाने तर हजारो किरकोळ फूल विक्रेते आहेत. दिवसाला वीस ते पंचवीस लाख रुपयांची फुलांची उलाढाल होते. असे फुलांचे प्रसिद्ध आडते सूरज गिरमे यांनी सांगितले. फुलांचा पनवेल, दादर, परेल, कल्याण, ठाणे, नवी मुंबई येथे घाऊक बाजार भरतो. त्या ठिकाणी बाराशे आडते काम करतात. पुण्यात दोनशे डेकोरेटर्स तर मुंबईत पाच हजार डेकोरेटर्स आहेत. विशेषत: लग्नसराईमध्ये मंगल कार्यालये, हॉटेल, सभागृह सजविण्याचे काम हे डेकोरेटर्स करतात. मुंबईमध्ये घरोघर जाऊन फुले विक्री करणारे लाखो लोक आहेत.
एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांत लग्नाचे मुहूर्त असतात. करोनामुळे लग्न समारंभ स्थगित झाले वा साधेपणाने करावे लागले. फु लांचा व्यवसाय थांबला असला तरी मजूर, खत, औषधे याचा खर्च तर करावाच लागतो. पण फुले तोडून त्याचे खत बनविताना मोठा खर्च येतो.
एप्रिलमध्ये दहा तर मेमध्ये सरासरी आठ लग्नतिथी होत्या. आता पुढे लवकर लग्नतिथी नाहीत. सजावटीचा व्यवसाय पूर्णपणे अडचणीत आला आहे. मजुरांना पैसे द्यावेच लागतात. पुण्यातील व्यावसायिकांचे किमान ५० कोटींचे नुकसान झाले. पुण्यात ५० हजार लोक फूल उद्योगावर अवलंबून आहेत. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे.
– स्वप्निल सरपाले, सरपाले फ्लॉवर र्मचट पुणे.