कराड : पुणे-बंगळूरू महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामासाठी कराडचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूरनाका येथील उड्डाणपूल पाडण्याच्या प्रत्यक्ष कामाला आज बुधवारी सायंकाळी उशीरा प्रारंभ करण्यात आला. दक्षिणोत्तर असलेला हा उड्डाणपूल उत्तरबाजूकडून म्हणजेच पंकज हॉटेलसमोरून जेसीबीच्या सहाय्याने तोडण्याचे काम सुरु झाले आहे.
केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पुणे-बंगळूरू महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ झाला होता. हे काम आता प्रत्यक्ष सुरु झाले आहे. या कामाचा मुख्य ठेका आदानी उद्योग समूहाकडे असून, सहठेकेदार म्हणून डी. पी. जैन कंपनी काम करीत आहे. कराडजवळ महामार्गाचे तब्बल १४ पदर बनणार असून, येथे होणारी वाहतुकीची प्रचंड कोंडी कायमची दूर करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी १८ वर्षांपूर्वी सेवेत रुजू झालेला कराडच्या हद्दीतून जाणारा हा पूल पाडला जाणार असल्याबाबत लोकांमध्ये एकच चर्चा होती. दरम्यान, आज सहठेकेदार डी. पी. जैन कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सत्येंद्रकुमार वर्मा यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पुलाचे पाडकाम सुरु करण्यात आले. याचबरोबर कराडलगतच्या मलकापूर शहरातून जाणारा दुसरा उड्डाणपूलही जमीनदोस्त करण्याचे कामही हाती घेतले जाणार आहे. हे पाडकाम जवळपास दीड महिने चालणार असून, इथे नवा सुसज्ज महामार्ग सेवेत येण्यासाठी तब्बल दोन वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या कालावधीत वाहतूक सुरळीत चालावी म्हणून पोलीस, प्रशासन, महामार्ग प्राधिकरण व संबंधित ठेकेदार कंपनीच्या संयुक्त धोरणानुसार वाहतुकीत प्रचंड बदल करण्यात आले आहेत. त्याची नुकतीच अंमलबजावणीही सुरु झाली आहे.