राज्यातील चार संशोधन व प्रशिक्षण केंद्रांसाठी २० कोटींची तरतूद
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये आता सेंद्रिय शेती संशोधनावर भर दिला जाणार आहे. तेथे सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रांची स्थापना करण्यात येणार असून, त्यासाठी राज्य शासनाकडून २० कोटी रुपयांच्या अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात (डॉ.पंदेकृवि) २००९ पासूनच सेंद्रिय शेतीवर संशोधन करण्यात येत आहे. आता त्याच धर्तीवर इतर विद्यापीठांमध्ये संशोधन करून शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सेंद्रिय शेती निसर्गातील विविध तत्त्वांवर आधारित आहे. यात रासायनिक खतांचा वापर कमी करून किंवा टाळून शेती केली जाते. याकरीता काडी-कचरा, धसकटे, तण, जनावरांचे मलमूत्र, अवशेष आदींचा वापर केला जातो.
सध्या रासायनिक खतांचा पर्याय म्हणून सेंद्रिय शेतीला महत्त्व आले आहे. सर्वच पिकांमध्ये कीटकनाशकांचा वाढलेला वापर मानवी आरोग्याला घातक ठरत आहे. त्यामुळे जमिनीतील पोषण तत्त्वावर होणारे परिणाम रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे ठरले आहे. येथील डॉ.पंदेकृविसह महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली या चार कृषी विद्यापीठांमध्ये या केंद्रांची स्थापना करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कृषी विद्यापीठांना प्रत्येकी ५ कोटींचे अनुदान मिळेल. या केंद्रांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीवर व्यापक संशोधन केले जाणार आहे. त्याची माहिती शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून त्यांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण दिले जाईल. या संदर्भात मंत्रालयात आतापर्यंत तीन बैठका झाल्या असून, या विद्यापीठांनी आपले प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर केले आहेत. विदर्भातील जमिनींचा पोत लक्षात घेता शेतकऱ्यांची सेंद्रिय शेतीकडे वळणे आवश्यक आहे, त्यामुळे डॉ.पंदेकृविने आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण दिले आहे. यासाठी निधीचा अडथळा होता. आता राज्य शासन अनुदान देणार असल्याने सेंद्रिय शेतीच्या संशोधन व प्रशिक्षणाला अधिक गती प्राप्त होणार आहे. अकोल्यात शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांनाही व कृषी पदवीच्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांमधून प्रशिक्षण दिले जात आहे. दोन विद्यार्थ्यांनी तर यावर आचार्य पदवीही मिळवली आहे. डॉ.पंदेकृविच्या याच भरीव कार्याची दखल राज्य शासनाने घेतली. पंदेकृविने पुढाकार घेऊन सेंद्रिय शेतीवर भरीव संशोधन करून बरयाच शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले.
आता याच धर्तीवर सर्वच कृषी विद्यापीठांमध्ये सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन होणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल, अशी माहिती कृषी अधिष्ठाता डॉ.व्ही.एम.भाले यांनी दिली.
सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रम
राज्यातील पहिला सेंद्रिय शेती पदविका हा महत्त्वाकांक्षी अभ्यासक्रम डॉ.पंदेकृविने यंदापासून पुन्हा सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम यापूर्वीच सुरू करण्यात आला होता. मात्र, निधीअभावी तो बंद पडण्याची स्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांना शिक्षण देणे हा या अभ्यासक्रमाचा मूळ उद्देश आहे. ६० विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेला हा अभ्यासक्रम यंदापासून पुन्हा सुरू करण्यात आला आहे.