अहिल्यानगरः इ. १२ वीच्या परीक्षा व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या पुढाकारातून, जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वॉर रूम’ स्थापन करण्यात आली आहे. इ. १२ वी परीक्षेचा आज, मंगळवारी पहिला पेपर होता. पहिल्याच दिवशी ही ‘वॉर रुम’ कार्यान्वित करण्यात आली आहे. या माध्यमातून तब्बल १ हजार परीक्षा खोल्यांचे ‘वेब कास्टिंग’ करण्यात आले आहे. या वेबकास्टिंगचे प्रक्षेपण ‘वॉर रुम’मध्ये केले जात आहे. त्यामुळे परीक्षा खोल्यातील प्रत्येक हालचाली टिपल्या जात आहेत व त्या वॉर रुम’मध्ये पाहिल्या जात आहेत.
यापूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदानाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित केली जात होती. परंतु १० वी व १२ वीच्या परीक्षेसाठी प्रथमच वॉर रूमचा प्रयोग जिल्ह्यात करण्यात आला आहे. १२ वीच्या परीक्षा संपल्यानंतर १० वीच्या परीक्षा सुरू होत आहे. ही वॉर रुम १० वीची परीक्षा संपेपर्यंत कार्यान्वित राहील, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक कडूस यांनी सांगितले. १२ वीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात १०९ परीक्षा केंद्र आहेत. या परीक्षा केंद्रातून ६३ हजार ६५८ परीक्षार्थींनी नावनोंदणी केलेली आहे. १०९ परीक्षा केंद्रातून १ हजार ९५० परीक्षा खोल्या आहेत. ५० टक्क्याहून अधिक वर्ग परीक्षा खोल्या वेब कास्टिंगच्या माध्यमातून जोडण्यात आल्या आहेत.
यापैकी शेवगाव, पाथर्डी, जामखेड, पारनेर, नेवासा व अहिल्यानगर शहर येथील ४० परीक्षा केंद्रे संवेदनशील ठरवली गेली आहेत. त्यासाठी या केंद्रात गेल्या पाच वर्षात झालेले गैरप्रकार लक्षात घेण्यात आले आहेत. १२ वीच्या परीक्षेचा आज इंग्रजीचा पेपर होता. त्यासाठी प्रवेशद्वारावर झडती, परीक्षा सुरू होण्यापूर्वी झडती तसेच ७ भरारी पथके, जिल्हाधिकारी नियुक्त दोन विशेष भरारी पथके, उपविभागीय अधिकाऱ्यांची ७ पथके व तहसीलदारांची १४ पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय वरील सहा तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर ड्रोनच्या माध्यमातूनही लक्ष ठेवले जात आहे.
परीक्षा केंद्रात हालचालींचे थेट प्रक्षेपण वॉर रूममध्ये केले जात आहे याशिवाय २० कॅमेराच्या माध्यमातून १० परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. वॉर रुममध्ये ५ अधिकारी व कर्मचारी नियंत्रण ठेवून आहेत. मोठ्या स्क्रीनवर परीक्षा सुरू होण्यापूर्वी सकाळी १० पासून ते परीक्षा संपेपर्यंत दुपारी २ पर्यंत परीक्षा केंद्र व परिसरातील प्रत्येक हालचाल टिपली जात असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी दरेकर यांनी दिली.दरम्यान आज पहिल्या दिवशी जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची व पेपर सुरळीत पार पडल्याची माहिती माध्यमातून शिक्षण विभागाकडून देण्यात आली.