सोलापूर : अयोध्येत रामलल्ला मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात निर्माण झालेले राममय वातावरण आजही कायम आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापुरात जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयसमोर साक्षात राम सीता, लक्ष्मण, हनुमान, रावण, कैकयी असे संपूर्ण रामायण अवतरल्याने त्याकडे नागरिकांचे लक्ष खिळून राहिले. प्रत्यक्षात लोककलावंतांनी आपल्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रामायणाचा देखावा सादर करावा लागला.
हेही वाचा >>> मोठी बातमी! एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि त्यांच्या संबंधित साधू-सन्याशांनी संपूर्ण देशवासियांना रामराज्याचे स्वप्न दाखविले आहे. मात्र रोजीरोटीसाठी दररोज राम, लक्ष्मण, सीता, हनुमानाची वेशभूषा करून गावोगावी फिरणा-या कलावंतांच्या आयुष्याला रामराज्यात कधी आकार मिळणार, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. मोहोळ येथील शाहीर विश्वासराव फाटे लोककला संस्था व सोलापूर जिल्हा लोककलावंत संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करताना रामायणातील सजीव देखावा सादर करण्यात आला.
वृध्द कलावंत आणि लोककलावंतांसाठी खंडित झालेली मानधन समिती गठीत करावी, मागील चार वर्षांपासून प्रलंबित असलेली मानधन मंजुरीची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, दरमहा किमान पाच हजार रूपये मानधन मिळावे, केंद्र सरकारच्या धर्तीवर कलावंतांना समान मानधन मिळावे, मराठी नाट्य परिषद व तमाशा परिषदेप्रमाणे लोककलावंतांचीही दरवर्षी परिषद घ्यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन झाले. या आंदोलनात वाघ्या-मुरळी, जात्यावरच्या ओव्या गाणारे कलावंत, कुडमुडे जोशी, भेदिक शाहीर, लोकशाहीर कलापथक, भारूड व कीर्तनकार, वासुदेव, बहुरूपी, तमाशा कलावंत, सनई, शिंग, बासरी, सुंद्री आणि हलगीवादक आदी कलावंत उतरले होते. या कलावंतांनी आपापल्या कलांचे सादरीकरण केले. लोककलेचे अभ्यासक प्रा. डॉ. महादेव देशमुख, शाहीर प्रा. डॉ. अजीज नदाफ, सुरेश बेगमपुरे, चंद्रकांत फाटे, राजू वाघमारे, यल्लप्पा तेली, गोविंद सितारे, शिवाजी गंगवणे, नागनाथ परळकर, महिबूब मुजावर, हाशम शेख, नागम्मा येडवली, गीताबाई सूर्यवंशी, सुभद्रा सूर्यवंशी, बजरंग घुले आदी कलावंतांचा त्यात सहभाग होता.