वाहतुकीबाबतही दंड आकारणीचे कायदे करण्याचे अधिकार संसदेला आहेत. मात्र, अशा प्रकारचे छोटे कायदे करण्याचे अधिकार राज्य शासनाला देण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गुरुवारी दिली.
महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्या वेळी ते बोलत होते. परिवहन राज्यमंत्री गुलाबराब बनकर, महापौर वैशाली बनकर, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), पुणे विद्यापीठाचे कुलगुरू वासुदेव गाडे, विजय कांबळे, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, आमदार गिरीश बापट, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, अभिनेता प्रशांत दामले आदी या वेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, देशात वाहनांची संख्या झपाटय़ाने वाढते आहेर. देशात दरवर्षी एक लाख ३६ हजार माणसे रस्ते अपघातात मृत्युमुखी पडत आहेत. ही संख्या राज्यात १३ हजार आहे. दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांची संख्या सध्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. त्यात श्रीमंत व शिकलेल्या माणसांची संख्या मोठी आहे. वर्षभरात अशा ४५ हजार लोकांना पकडण्यात आले. कोणत्याही कायद्याला लोकांचे पाठबळ मिळत नाही, तोवर कायदे अमलात येणार नाहीत. आपल्याकडे वाहतुकीबाबत परदेशाच्या तुलनेत कायदे कडक नाहीत. कधी कधी व्यवस्थेबद्दल अश्चर्य वाटते. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांचा दंड वाढविण्याचे अधिकार थेट संसदेला आहेत. अशा प्रकारचे जुजबी कायदे करण्याचे अधिकार राज्य शासनाकडे देण्याची आवश्यकता आहे.
हेल्मेटबाबत प्रबोधनावरच भर
पुण्यात हेल्मेटच्या सक्तीला होणाऱ्या विरोधाबाबत बोलताना पाटील म्हणाले, हेल्मेट वापराला विरोध का होतो, हे कळत नाही. हेल्मेट घालताना डोक्यातील पगडी काढावी लागते, अशी भूमिका मांडली असती तर पटली असती. त्यामुळे एकतर हेल्मेट घाला अन्यथा, कायम पगडीच वापरा. मात्र, मी हेल्मेटबाबत वादाला तोंड फोडू इच्छित नाही. याबाबत लोकप्रबोधन करण्यावरच भर राहणार आहे.
‘ वाहनांची हवा सोडा’
वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांच्या वाहनातील हवा सोडण्याची पूर्वीची पद्धत पुन्हा सुरू केली पाहिजे, असे मत प्रशांत दामले याने या वेळी मांडले. नियम तोडल्यास भरलेल्या दंडापेक्षा ही शिक्षा परिणामकारक ठरेल, असेही तो म्हणाला. गुलाबराव देवकर यांनी प्रशांतच्या या सूचनेला पाठिंबा दर्शवित असी पद्धत सुरू करण्यास हरकत नसल्याचे सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा