कर्जत तालुक्यातील भीषण दुष्काळात उपलब्ध करून देण्यात आलेल्या चाऱ्यातही मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल शर्मा यांनी केला आहे. संस्थाचालक, तहसीलदार, मंडलाधिकारी, कामगार तलाठी व पशुसंवर्धन अधिकारी यांनी संगनमातने केलेला एक कोटींचा हा गैरव्यवहार  माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीमुळे उघड झाल्याचे त्यांनी सांगितले.  
तालुक्यातील बारडगावदडी येथील एकनाथ पाटील ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थचे अध्यक्ष चमस थोरात यांनी जनावरांचा चारा प्रत्यक्षात आणलाच नाही, तो केवळ कागदोपत्री दाखवला. त्यासाठी खोटे रेकॅार्ड बनवले व तब्बल एक कोटी रूपयांचा चारा घोटाळा केला. यामध्ये तहसीलदार सुरेश थोरात, मंडलआधिकारी रासकर, कामगार तलाठी एम. ए. पठाण व पशुवैद्यकीय आधिकारी सपकाळ यांचा सहभाग असल्याचा आरोप शर्मा यांनी केला. त्यांनी सर्व कागदपत्रांच्या साक्षांकीत प्रती तहसील कार्यालयामधूनच माहितीच्या आधिकारात मिळवल्या, त्या पत्रकारांना दिल्या आहेत. यासंदर्भात नागपूरच्या हिवाळी आधिवेशनात विनोद तावडे व एकनाथ खडसे या दोघानीही तारांकीत प्रश्न विचारला असून तहसील कार्यालयाने माहितीही पाठवली आहे.
एकनाथ पाटील या संस्थेने चारा आणण्यासाठी जे वाहनाचे क्रमांक दिले आहेत, त्यातील वाहने ठाणे, कल्यान, पेण, रत्नागिरी, कोल्हापुर, सातारा, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापुर, नगर, जालना, बीड, धुळे, मालेगांव, नाशिक अशा विविध शहरांमधील आहेत. गंमतीचा भाग म्हणजे लुना, एमएटी, जेसपी, मोटारसायकल, स्कुटर, मिनीडोअर, मारूतीकार अशी ही वाहने आहेत. यातील १९८९ सालच्या लुना गाडीवरून एकावेळी तब्बल २३ टन ५४० किलो चारा आणल्याचे दाखवले आहे. तसेच एमएटी या मोपेडवर १५ टन २४५ किलो, मारूती कारमध्ये सुमारे १८ टन तर जेसीबीमधुन एका वेळी २० टन चारा वाहून आणल्याचे दाखवले आहे. अशा प्रकारे अनेक बोगस क्रमांकाची वाहने दाखवलेली आहेत. सरपंच नितीन पिसे यांनाच या वाहनांवर ड्रायव्हर म्हणून दाखवले आहे.
या सर्व वाहनांतुन ७२ दिवसात तब्बल ५ हजार ११६ टन एवढा प्रंचड चारा आणून तो जणांवराना वाटला असल्याचे दाखवले आहे. लाभार्थीची कार्डेदेखील अपुर्ण व बनावट आहेत.
एकनाथ पाटील ही संस्था अशा प्रकारे बनावट चारा देत असल्याची दाखवून मोठा गैरव्यवहार करीत असल्याची तक्रार आनिल शर्मा व जयसिंग लालाचंद कदम यांनी नगरचे जिल्हाधिकारी, महसुलमंत्री, पालकमंत्री, विरोधी पक्षनेते, प्रातंधिकारी, तहसीलदार यांच्याकडे वांरवार केली होती. चौकशीसाठी शेतकऱ्यांसह उपोषणही केले होते. मात्र तहसीलदार सुरेश थोरात यांच्याविरूध्द उपोषण सुरू असताना त्यांनाच प्रांताधिकाऱ्यांनी उपोषण सोडवण्यास पाठवले. त्याही पुढे जाऊन ज्या मंडलधिकारी व कामगार तलाठय़ाचा यात हात आहे, त्यांचाच चौकशी समितीत समावेश होता. याबाबत शर्मा यांनी माहितीच्या आधिकारात पत्र दिले होते, मात्र त्यालाही महसूल आधिकाऱ्यांनी दाद दिली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा