सिंहस्थ काळात खाद्य विक्रेत्यांकडून भाविकांना दुषित पदार्थ दिले जाऊ नयेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने सखोल तपासणी करावी असे निर्देश विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिले. या कामासाठी विभागाने आवश्यक मनुष्यबळ बाहेरील जिल्ह्यातून उपलब्ध करावे असेही त्यांनी सूचित केले.
बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सिंहस्थ आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर आदी उपस्थित होते. सिंहस्थ कालावधीत लाखो भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे दाखल होणार आहेत.
यामुळे त्यांना चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ उपलब्ध होतील याची दक्षता घेणे महत्वाचे आहे. महापालिकेने स्टॉलचा लिलाव करताना दूध, भाजीपाला, खाद्यपदार्थ, पाणी आदी आवश्यक वस्तुंसाठी काही स्टॉल्स आरक्षित ठेवावे. बाजारभावापेक्षा अधिक किंमतीने वस्तू विकल्या जाणार नाही याची हमी स्टॉलधारकांकडून घ्यावी असेही त्यांनी नमूद केले.
बैठकीत घाट सुशोभिकरण, घाटावरील विद्युत व्यवस्था, वाहनतळ, सीएसआर अंतर्गत ‘एलइडी वॉल्स’ लावणे आदी कामांवर चर्चा करण्यात आली. सीएसआर अंतर्गत एलईडी वॉल्स बसवून देणाऱ्या एजन्सीला व्यावसायिक उपयोगासाठी योग्य जागा दिली जाणार आहे.
या वॉल्सच्या सहाय्याने भाविकांना विविध प्रकारच्या सुचना देण्याचे नियोजन आहे. वॉल्स बसवू इच्छिणाऱ्या संस्थांनी कुंभमेळा कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Story img Loader