तुमच्याप्रमाणे शेतकऱ्याला महागाई नाही का? त्याला काय मुलं, बायको, शिक्षण नाही का.? असा रोखठोक सवाल, उसाला द्याव्या लागणाऱ्या पाण्याची चर्चा होते, पण त्यातून निर्माण होणाऱ्या मूल्याचा विचार का नाही?. असे मुद्दे, सुधारित वाण विकसित करण्यासाठी अणुतंत्रज्ञानाचा कसा वापर होतो अशी उलगडलेली माहिती आणि शेतीचा टक्का कमी होत नसून, तोच देशाची अर्थव्यवस्था व रोजगारनिर्मितीच्या आशेचा किरण आहे, असा व्यक्त झालेला आशावाद.. अशा विचारप्रवर्तक चर्चेसह ‘बदलता महाराष्ट्र’च्या पहिल्या दिवसाची सत्रे पार पडली अन् शेतीक्षेत्राची सद्य:स्थिती आणि प्रगतीचा आलेख उलगडत गेला. या चर्चेत बहुतांश वक्त्यांनी केंद्र सरकारच्या अन्नसुरक्षा विधेयकावर टीका केली आणि हा मोठा विनोद असल्याची मांडणी केली.
फोटो गॅलरीः बदलता महाराष्ट्र
बदलणाऱ्या महाराष्ट्राचा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँक’ यांनी सुरू केलेल्या उपक्रमाच्या ‘तिसऱ्या’च्या वतीने आयोजित ‘बदलता महाराष्ट्र’ या मालिकेच्या तिसऱ्या पर्वात ‘शेती आणि प्रगती’ या विषयावरील चर्चासत्राला सोमवारी सुरुवात झाली. त्यात पार पडलेल्या तीन सत्रांमध्ये विविध तज्ज्ञ, अभ्यासक व ज्येष्ठ शेतकरी नेत्यांनी विविध विषयांवर प्रकाश टाकला.
या पर्वाची सुरुवात ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे आणि शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी या दिग्गजांच्या उपस्थितीत झाली. कोल्हे यांनी शेतकऱ्यांची बिघडलेली परिस्थिती सविस्तर मांडली. शेतकरी हा पूर्वीपासून पूर्ण वेळ शेती करत नव्हता, तर सोबत मुलूखगिरी करायचा, हे शरद जोशी यांनी सांगितले. सध्या तर शेतकरी शेतमाल विकून नव्हे, तर जमिनीचे तुकडे विकून जगत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सरकारच्या धोरणांमुळे शेतीची जमीन घटत असून, शेतीवर काम करण्याची कोणाचीही इच्छा उरलेली नाही. अशी स्थितीत केंद्र सरकारने कोण्या एका व्यक्तीच्या मर्जीखातर अन्नसुरक्षा विधेयक ढकलून न्यावे हा मोठा विनोदच आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. कोल्हे यांनी शेतकऱ्याकडे सर्वाचेच कसे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले. शेतीमालाच्या किमती वाढल्या, की आरडाआरडो होतच असल्याचे उदाहरण देत त्यांनी, इतरांना महागाई निर्देशांक असतो, मग शेतकऱ्याला का नाही, असा परखड सवाल केला.
‘शेती व सहकार’ या सत्रात खासदार शेट्टी यांनीही अन्नसुरक्षा विधेयकाची खिल्ली उडवली आणि यातून शेतकऱ्याचे नुकसानच होणार असल्याची टीका त्यांनी केली. कृषी अर्थतज्ज्ञ प्रदीप आपटे यांनी सांगितले की, उसाला जास्त पाणी दिले जात असल्याचे आपण बोलतो, पण त्याच्या उत्पादनाची या अनुषंगाने चर्चा कधी होणार? कृषी तज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी शेतीमालाच्या दुहेरी किमतीचा मुद्दा मांडला.
ते म्हणाले, ‘शेतीमाल कोण वापरतो, यावर त्याच्या किमती ठराव्यात. जेवणात साखर खाणारा सामान्य माणूस आणि याच साखरेवर महागडे पदार्थ बनवणारा उत्पादक यांच्यासाठी वेगळे दर असायला हवेत.’
‘शेती- नवे तंत्र, नवे वाण, नवे ज्ञान’ या विषयावर शास्त्रज्ञ डॉ. आनंद कर्वे, भाभा अणुसंशोधन केंद्राचे डॉ. शरद काळे, जैन इरिगेशनचे अतुल जैन आणि इस्रायलचे वाणिज्यदूत जॉनेथन मिलर यांनी आपली मते मांडली. शेतीचे वाण विकसित करण्यासाठी आणि शेतीमाल टिकवण्यासाठीसुद्धा अणुसंशोधन कसे वापरले जाते, हे काळे यांनी सांगितले.
असेही मुद्दे..
अन्न सुरक्षा विधेयक म्हणजे, एक रुपयाने
ज्वारी घ्यायची आणि ती दळण्यासाठी पाच रुपये द्यायचे!..
– राजू शेट्टी
*******
मोबाइलचा रीचार्ज करताना कोणी विचार करत नाही, पाण्याची बाटली विकत घेतानाही ओरडत नाही, पण भाज्यांचे भाव वाढले की बोंबाबोंब..
– शंकरराव कोल्हे
*******
एक मीटर जाडीचा थर असलेल्या मातीत इतकी खनिजे असतात, की २५ हजार वर्षांपर्यंत चांगली शेती करणे शक्य आहे. मुद्दा आहे तो खनिजे पिकांपर्यंत पोहोचवण्याचा. –  डॉ. आनंद कर्वे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा