लोकशाही अधिक प्रगल्भ करण्यासाठी माध्यमातून होणारे समाजप्रबोधन महत्त्वाचे असून या प्रबोधन प्रक्रियेला संस्कृती आणि संस्काराची जोड दिल्यास माध्यमातील विचार अधिक प्रभावी ठरतील. असे प्रतिपादन जिल्ह्य़ाचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी केले. माध्यमांद्वारे विचार मांडताना कोकणाला लाभलेल्या उन्नत संस्कृतीचा वारसा जपला जाईल, याची विशेष दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.
एडिटर्स गिल्ड व रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने येथील गोगटे – जोगळेकर महाविद्यालयातील राधाबाई शेटय़े सभागृहात पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निवृत्त विधिमंडळ सचिव भास्करराव शेटय़े, एडिटर्स गिल्डचे अध्यक्ष बाळ भिसे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रशीद साखरकर, भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अ‍ॅड. राजशेखर मलुष्टे, अ‍ॅड. मिलिंद पिळणकर, माजी आमदार बाळ माने, इलेक्ट्रॉनिक माध्यम संघटनेच्या अध्यक्षा उज्ज्वला पंगेरकर, प्रेस फाऊन्डेशनचे अध्यक्ष प्रकाश वराडकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे, जि. पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रदीप साळवी उपस्थित होते.
जाधव पुढे म्हणाले, कोकणाला उन्नत संस्कृतीचा वारसा लाभला असून माध्यमाद्वारे विचार मांडताना हा वारसा जपला जाईल याची दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर लिखाणाला संदर्भमूल्य असल्यास वाचकाला आनंद मिळण्याबरोबरच लोकशिक्षणाची प्रक्रियाही गतिमान होते. सततचे वाचन आणि अभ्यासातून पत्रकारांनी शब्दशक्ती संपादन केल्यास त्यांचे लेखन दीर्घकाळ परिणाम करणारे ठरेल. माध्यमांनी समाजप्रबोधन आणि समाजहित डोळ्यासमोर ठेवून वस्तुनिष्ठ लेखण केल्यास देशाच्या उन्नतीबरोबरच लोकशाही अधिक प्रगल्भ होईल, असे ते म्हणाले.
आजच्या तरुणाईला लोकशाहीतील आदर्श मूल्यांनी युक्त विचार देण्याची गरज आहे. स्वातंत्र्याची नेमकी संकल्पना समजावून देताना त्यांच्यातील कर्तव्य भावनेचा विकास घडवून आणण्याची ताकद माध्यमामध्ये आहे. समाजासाठी योगदान देण्याची भावना नव्या पिढीमध्ये रुजविण्यासाठी समृद्ध असलेल्या मराठी भाषेचा उपयोग करणे उचित ठरेल, असे त्यांनी सांगितले. पत्रकारितेबद्दल नागरिकांच्या मनात आदरयुक्त भीती असली पाहिजे. त्यासाठी पत्रकारांनी तटस्थपणे अवलोकनावर आधारित विचार मांडून विश्वासार्हता वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले. लोकशिक्षण घडवून आणताना चुकीच्या बाबींवर शाब्दिक फटकारे मारल्यास परिपक्व समाजनिर्मितीस पत्रकारांचे मोठे योगदान मिळू शकते असे ते म्हणाले.
कै. बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या अल्पायुष्यात प्राप्त केलेले ज्ञान अनेकांना प्रेरणादायी आहे. त्यांनी अनेक विषयांचा अभ्यास करून ‘दर्पण’च्या माध्यमातून आपले विचार जनतेपर्यंत पोहोचविले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अलौकिक कार्य केल्यानेच दोनशे वर्षांनंतरही वृत्तपत्रसृष्टीवर त्यांच्या विचारांचा असलेला प्रभाव कायम आहे. नव्या पिढीला त्यांच्या कार्याचा हा आदर्श निश्चितच प्रेरक करेल, असा विश्वासही पालकमंत्री जाधव यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांचे कौतुक करताना, पर्यटकांना रत्नागिरी जिल्ह्य़ाची ओळख व्हावी यासाठी त्यांनी काढलेली पर्यटनरत्न ही पुस्तिका उल्लेखनीय असल्याचे सांगितले.
विधिमंडळाचे निवृत्त सचिव भास्करराव शेटय़े म्हणाले, लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी एक असणाऱ्या पत्रकारितेचा इतर दिन्ही स्तंभांशी जवळचा संबंध येत असल्याने विषयाचा सखोल अभ्यास करून जनतेसमोर सत्य ठेवण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. पत्रकारिता म्हणजे जनतेला सत्याकडे नेण्याचे साधन असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अ‍ॅड. राजशेखर मलुष्टे अ‍ॅड. मिलिंद पिळणकर, डॉ. किरण यांचीही समयोचित भाषणे झाली. बाळभिसे यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेमुळे निर्माण झालेल्या स्पर्धेत छोटी वृत्तपत्रे मागे पडत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून अशा छोटय़ा वृत्तपत्रांना आधार देण्यासाठी योग्य उपाय योजले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. एम. डी. शंकासन, अरविंद कौकजे, दत्ता मुकुंद सावंत यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाला कुमाल शेटय़े, बशीर मुर्तझा, राजन शेटय़े बबन आंबेकर, साईनाथशेठ नागवेकर, अ‍ॅड. नितीन नागवेकर, राजेश मयेकर, सतीश पालकर, मनोज लेले, राजू साळवी, प्रसाद जोशी, सचिन बोरकर, विजय मालगुंडकर, प्रसांथ हर्चेकर आदी पत्रकारांसह भोगोजीशेठ कीर विधी महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील पत्रकारिता शाखेचे विद्याथी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. एडिटर्स गिल्डचे सचिव राजेंद्र प्रसाद मसुदकर यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी लोकमान्य टिळक जन्मस्थळी असलेल्या त्यांच्या पुतळ्याला पालकमंत्री जाधव व पत्रकार संघाचे अध्यक्ष साखरकर व प्रदीप साळवी यांनी पुष्पहार अर्पण केले.

Story img Loader