छत्रपती संभाजीनगर : जेथे दोन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालये आहेत त्यांचे अभियांत्रिकीत रूपांतर करण्याच्या निर्णयानुसार राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी लातूरच्या ‘पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतन’बाबत निर्णय घेतला. मात्र, जालन्याचा निर्णय लटकत ठेवला आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संख्येमध्ये मराठवाड्याचा ‘अनुशेष’ ठेवून विदर्भ एक पाऊल पुढेच राहील, याची खबरदारी घेतली की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर व नांदेड येथील मिळून दोनच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. विदर्भाला मात्र तीन नवीन अभियांत्रिकी महाविद्यालये मिळाली आहेत. त्यातील एक यवतमाळचे असून, तेथील दोन शासकीय तंत्रनिकेतनमधून एकाचे अभियांत्रिकीत रूपांतर झाले आहे. याशिवाय चंद्रपूर, नागपूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मिळाले आहे. अमरावतीमध्येही एक शासकीय महाविद्यालय आहे. विदर्भात शासकीय अभियांत्रिकीची संख्या एकूण चार झाली आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने यापूर्वीच्या महायुती सरकारच्या काळात जेथे दोन शासकीय तंत्रनिकेतन आहेत त्यातील एकाचे अभियांत्रिकीत रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मराठवाड्यातील जालना व लातूरमधील तंत्रनिकेतनचे रूपांतर अभियांत्रिकीत करण्याची प्रक्रिया रखडली होती. त्यातील लातूर येथे पूरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनचे अभियांत्रिकीत रूपांतर करण्याचा निर्णय १५ एप्रिल रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. येत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालय सुरू होणार आहे. मात्र, जालन्यातील दोन तंत्रनिकेतपैकी एकाचे अभियांत्रिकीत रूपांतर करण्याचा निर्णय लटकत ठेवला आहे. जालना जिल्ह्यात जालना शहर व अंबड येथे शासकीय तंत्रनिकेतन आहे.

लातूरचा प्रस्ताव पाठवलेला

लातूर येथील पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतनचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात रूपांतर करण्याविषयीचा प्रस्ताव पाठवला होता. जालन्याबाबत तूर्त निर्णय नाही. – अक्षय जोशी, सहसंचालक, तंत्रशिक्षण, विभागीय कार्यालय.

मराठवाड्यात साधारणपणे ५४ खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. त्यात विद्यार्थ्यांच्या जागा १४ हजारच्या आसपास असून, यंदा प्रवेश केवळ ८ हजारांच्या संख्येत झाल्याची माहिती आहे.