रासायनिक कारखान्यामुळे दूषित झालेली किनारपट्टी, परप्रांतीयांचे अतिक्रमण आदी मानवनिर्मित संकटांबरोबरच निसर्गाच्या लहरीपणामुळे कोकणच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणारा आणि देशाला प्रतिवर्षी हजारो कोटींचे परकीय चलन मिळवून देणारा मासेमारी व्यवसाय संकटात सापडला असून, यावर उदरनिर्वाह असलेला मच्छीमार व त्याची कुटुंबे देशोधडीला लागण्याची वेळ आहे.
मच्छीमारासमोरील समस्या तर गेल्या अनेक वर्षांपासून आ वासून उभ्या आहेत. मात्र त्या सोडविण्यासाठी राज्यकर्ते हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत आणि म्हणूनच देशभरातील
मच्छीमारांनी आपल्या समस्या सोडवून घेण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, अशा भावना रत्नागिरीत आयोजित पारंपरिक मासेमारी समस्या व निवारण या चर्चासत्रात भाग घेताना सर्वच वक्त्यांनी पोटतिडकीने मांडल्या.
येथील मिरकरवाडा आदर्श मच्छीमार संस्थेच्या सभागृहात नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमन (नॅफ) या संघटनेने या चर्चासत्राचे आयोजन केले होते. या वेळी कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील, नॅफचे उपाध्यक्ष अब्दुल रशीद सोलकर, मुंबई नॅफचे अध्यक्ष प्रकाश बोबडी, प्रदेशाध्यक्ष राजहंस टपके, लतीफशेठ मालदार, अमजद बोरकर, अप्पा वांदरकर, मनोहर तथा दादा मयेकर, आदर्श मच्छीमार संस्थेचे चेअरमन इम्तियाज होडेकर, माजी चेअरमन सुलेमान मुल्ला, सेक्रेटरी आसिफ कोतवडेकर, हर्णे मच्छीमार संस्थेचे चेअरमन पी. एन. चौगुले, नवानगर मच्छीमार संस्थेचे चेअरमन दत्ताजीराव वणकर, कोळी समाज नेते रामकृष्ण केणी, गाबित संघाचे शंकर हरी पोसम आदी उपस्थित होते.
अमजद बोरकर आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, ज्या समुद्रात येथील गरीब
मच्छीमार गेल्या अनेक पिढय़ा हा व्यवसाय करीत आहे, त्या समुद्रावरच त्याचा हक्क राहिलेला नाही; तसाच तो ज्या किनारपट्टीत राहत आहे, त्या किनारपट्टीवरही त्याचा हक्क, अधिकार राहिलेला नाही, तर या किनारपट्टय़ा बडय़ा उद्योगपतींच्या घशात घालून तेथे प्रदूषण फैलावणारे संहारक कारखाने उभे करण्याचे राज्य शासन अघोरी कृत्य करीत आहे. एकूण कोकणासह देशभरातील मच्छीमारांना देशोधडीला लावण्याचा राज्यकर्त्यांचा डाव असून तो उधळून लावण्यासाठी मच्छीमारांनी रस्त्यावर उतरण्याची नितांत गरज आहे, असे बोरकर म्हणाले.
या वेळी कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील यांनी आपल्या भाषणात अशा स्वरूपाचे चर्चासत्र आयोजित करणे हा एक चांगला उपक्रम असल्याचे सांगून नॅफच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले, तसेच आपल्या समस्या सोडवून घेण्यासाठी सर्वानी एकजुटीने रस्त्यावर उतरण्याची गरज निर्माण झाली असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. तर नॅफचे प्रदेशाध्यक्ष राजहंस टक्के यांनी नॅफच्या माध्यमातून मच्छीमारांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही दिले. या वेळी आदर्श मच्छीमार संस्थेचे माजी चेअरमन सुलेमान मुल्ला, लतीफशेठ मालदार, अप्पा वांदरकर, मनोहर मयेकर आदी नेत्यांनीही मच्छीमारांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. हे चर्चासत्र आयोजित करण्यासाठी व ते यशस्वी होण्यासाठी आदर्श मच्छीमार संस्थेचे सेक्रेटरी आसिफ कोतवडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
समस्या सोडविण्यासाठी मच्छीमारांनी रस्त्यावर उतरण्याची गरज
रासायनिक कारखान्यामुळे दूषित झालेली किनारपट्टी, परप्रांतीयांचे अतिक्रमण आदी मानवनिर्मित संकटांबरोबरच निसर्गाच्या लहरीपणामुळे कोकणच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणारा आणि देशाला प्रतिवर्षी हजारो कोटींचे परकीय चलन मिळवून देणारा मासेमारी व्यवसाय संकटात सापडला असून,
First published on: 14-03-2013 at 04:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For solving the fishermans problemstime to take protest