मधु मंगेश कर्णिक यांचा सवाल
मराठी साहित्य जागतिक स्तरावर आधीच पोहचलेलं असताना विश्व साहित्य संमेलनाचा व्याप कशासाठी? यापेक्षा गावागावांत मराठी संस्कृती टिकवणाऱ्या लोककलावंतांना पुढे आणणे, त्यांची परिस्थिती सुधारणे गरजेचे आहे. लोककलावंताच्या उमेदीवर पाणी फिरवून अशा खर्चिक, अनाठायी उपक्रमांमधून मराठी टिकवण्याची उसनी कर्तबगारी महत्त्वाची नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी केले.
जागतिक मराठी अकादमी व कर्मवीर भाऊसाहेब हिरे प्रतिष्ठानच्या वतीने येथील महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या मराठी संमेलनाच्या समारोपात कर्णिक बोलत होते. महाराष्ट्राचं काय होणार, मराठी भाषेबद्दलचा कळवळा याविषयी वेगवेगळ्या माध्यमातून वारंवार बोलले जात आहे. भाषिक पर्यावरण बदलत असले तरी जोवर मराठी मने एकमेकांशी बांधली जात आहेत, तोपर्यंत मराठी नदीसारखी अखंड प्रवाही राहील. संस्कृती, आपली नातीगोती, आपली माती ही मनातून जात नाही. जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी आठवणींमध्ये, संस्कारामध्ये ती टिकून राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भूतकाळ, वर्तमानकाळ यांना सांधत समृद्ध भविष्याची आखणी करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या वेळी व्यासपीठावर मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, अॅड. नितीन ठाकरे, नानासाहेब सोनवणे, राजीव मंत्री, केसरी पाटील, आर. एम. हेजिब, अजय बोरस्ते आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष आ. डॉ. अपूर्व हिरे उपस्थित होते. समारोपाप्रसंगी लोककलावंत मीरा उमप व सहकाऱ्यांनी लोकगीतांसह लोकवाद्यांच्या तालावर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गौरव गीत, पोवाडा, वासुदेव गीत सादर केले.