लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर-TVपुणे महामार्गावर टेंभुर्णी येथील एमआयडीसी परिसरातील एका कारखान्यात मध्य प्रदेशातील तीन महिलांसह सहा मजुरांना कोणतीही मजुरी न देता डांबून ठेवले आणि त्यांच्याकडून बळजबरीने कामे करून घेण्याचा वेठबिगारीचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी संबंधित कंपनीच्या मालकासह व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी व इतराविरुद्ध वेठबिगारी पद्धती उच्चाटन अधिनियमासह अन्य कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. सोलापूर जिल्ह्यात वेठबिगारी पद्धती उच्चाटन अधिनियमाखाली कारवाई होण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना मानली जाते.
याप्रकरणी अंतिम संतुजी शितोले (वय ४०, रा. बडवाह, जि. खरगौन, मध्य प्रदेश) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्याकडील मजूर सर्जन थावरसिंह बामणे, ग्यारहसिंह ऐरंग्या चौहान व त्याची पत्नी शारदाबाई चौहान, बीना गोमरसिंह बासकल, शारदाबाई किसन बामणे आणि पारूबाई रमेश बामणे अशी वेठबिगारीला बळी पडलेल्या मजुरांची नावे आहेत. या सर्वांना ऊसतोड मजूर म्हणून संबंधित ठेकेदाराने टेंभुर्णी येथील मिलेनियम बोर्ड प्रा. लि. कंपनीच्या कारखान्यात आणण्यात आले होते. प्रत्यक्षात तेथे ऊसतोडणीचे नव्हे तर घन लाकडासह पर्सिकल बोर्ड आणि फायबर बोर्ड तयार करण्याचे काम करून घेतले जात होते.
गेल्या ४ मार्च रोजी दुपारपासून या मजुरांना कारखान्यात ठेवून काम करून घेत असताना त्यांना हक्काची किमान मजुरीही दिली जात नव्हती. मजुरी मागितली असता मजुरांचा छळ केला जात असे. पारूबाई बामणे या महिला मजुराला मारहाण करण्यात आली. मजुरी न देताच बळजबरीने कामे करून घेण्यासाठी सर्व मजुरांना कारखान्यात डांबून ठेवण्यात आले होते. शेवटी या वेठबिगारीची माहिती उजेडात आली. नंतर सर्व मजुरांची कारखान्यातून सुखरूप सुटका करण्यात आली.
याप्रकरणी कारखान्याचे मालक, मजूर ठेकेदार, कार्यकारी व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी आदींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यात कोणालाही लगेचच अटक करण्यात आली नाही.