हिवाळय़ात स्थलांतरित होणाऱ्या परदेशी व देशांतर्गत विविध जातींच्या पक्ष्यांचे थवे कराडनजीकच्या पाणवठय़ांवर दिसून येत आहेत. या परिसरात सध्याचे पोषक वातावरण व आवश्यक खाद्य पक्ष्यांसाठी उपलब्ध असल्यानेच स्थलांतरित पक्ष्यांचे या विभागातील प्रमाण दिवसेंदिवस वाढतेच राहिल्याचे पक्षिमित्र व शासनाचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे सांगतात.
कराड परिसरानजीकच्या नदीकाठांसह विविध पाणवठय़ांवर तसेच शेतात साठलेल्या पाण्यावर दाखल झालेले पक्षी पक्षिमित्र व पर्यावरणप्रेमींना आकर्षित करीत आहेत. तर, हौसी छायाचित्रकार या पाहुण्या पक्ष्यांना आपल्या कॅमेऱ्यात चित्रबद्ध करण्यासाठी छोटय़ाशा सहलीवर ठिकठिकाणचे पाणवठे व नदीकाठ धुंडाळत आहेत. निसर्ग साखळीत पक्ष्यांचे स्थान महत्त्वाचे असल्याने पर्यावरण अभ्यासकही पक्ष्यांच्या या आगमनाकडे डोळे लावून राहताना, त्यांच्या एकंदर दिनचर्येचा आढावा घेताना दिसतात. सध्या काही ठिकाणी कमालीची थंडी, शून्य अंशाचे तापमान राहात असल्याने त्या ठिकाणचे पाण्यातील आपले भक्ष्य अर्थात खाद्यही पाण्याबरोबर गोठले जात असल्याने काही दुर्मिळ पक्षी आपल्याला पोषक वातावरण व खाद्यासाठी सर्वदूर संचार करीत योग्यस्थळी पोहोचत असतात. त्याचाच एक भाग म्हणून कराडनजीक हिवाळय़ात दाखल होणाऱ्या पक्ष्यांकडे अभ्यासक पाहात असतात. मर्यादित थंडीचे वातावरण, जलपर्णी, जलचर, छोटे मासे, कृमी कीटक यांची या परिसरात उपलब्धता असल्याने काही परदेशी पक्ष्यांसह देशांतर्गत पक्ष्यांचेही येथे दर्शन होताना त्यांचे काही काळाकरिता वास्तव्य राहत आहे. आवाज फाउंडेशनने अशी पाणतळी व पाणवठे विकसित करून, त्याचे संवर्धन होण्याकामी शासन दरबारी केलेले प्रयत्न महत्त्वाचे ठरल्याचे पर्यावरणप्रेमी आवर्जून सांगतात.
परदेशी युरेशियन स्पूनबील व पेंन्टेड स्टार्क अर्थात रंगीत करकोचा, व्हाइट आयबीस, ग्रे हेरॉन, शॉ व्हेलर, मोठय़ा मानेचा बगळा, शेकाटय़ा, गोल्डन डक, कॉमन कुट अर्थात नामदेव, जांभळी पाणकोंबडी आदी देशांतर्गत विविध भागातील तसेच, परदेशी पाहुणे पक्षी दूरचा प्रवास करीत सध्या येथे विसावले आहेत. या पक्ष्यांची सध्याची स्थळ चांगल्या पद्धतीने विकसित करण्याची गरज व्यक्त करताना, तसे झाल्यास वरील पक्ष्यांचे येथे येण्याचे प्रमाण निश्चितच वाढेल व अन्य काही प्रकारचे पक्षीही इथे येतील, असा विश्वास पक्षिमित्र रोहन भाटे यांनी व्यक्त केला आहे.
कराडनजीकच्या पाणवठय़ांवर परदेशी पाहुणे
कराड परिसरानजीकच्या नदीकाठांसह विविध पाणवठय़ांवर तसेच शेतात साठलेल्या पाण्यावर दाखल झालेले पक्षी पक्षिमित्र व पर्यावरणप्रेमींना आकर्षित करीत आहेत. तर, हौसी छायाचित्रकार या पाहुण्या पक्ष्यांना आपल्या कॅमेऱ्यात चित्रबद्ध करण्यासाठी छोटय़ाशा सहलीवर ठिकठिकाणचे पाणवठे व नदीकाठ धुंडाळत आहेत
First published on: 08-11-2014 at 03:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Foreign birds enjoying river edge and ponds karad