भौगोलिक आणि पर्यावरणीय बदलांचे वैज्ञानिक संकेत देणारे विदेशी पक्ष्यांचे स्थलांतरण प्रचंड संकटात आहे. मानवी हस्तक्षेप, दुष्काळ, वनवणवे, दुर्मीळ होऊ लागलेली पाणस्थळे आणि शौकासाठी केली जाणारी शिकार यामुळे स्थलांतरित पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. जागोजागी उभारले जात असलेले टॉवर, उंच इमारती विशेषत: काचेच्या इमारतींनीही पक्ष्यांना धोका निर्माण झाला आहे. थंडीचा मोसम सुरू होताच देशभरातील विविध जलाशयांवर विदेशी पक्ष्यांचे आगमन होऊ लागले आहे. महाराष्ट्रातही विविध प्रजातींचे विदेशी पाहुणे आले आहेत. परंतु, स्थलांतरित पक्ष्यांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेतली गेल्याचे कोठेही दिसत नाही.
पक्षी स्थलांतरण ही वर्षांतून दोन वेळा होणारी सामान्य प्रक्रिया नाही. पक्ष्यांच्या थव्यांनी लाखो मैलांचे अंतर कापून दुसऱ्या देशात जाणे आणि पुन्हा मूळ ठिकाणी परतीचा प्रवास करणे, यामागचे रहस्य उलगडण्याचे प्रयत्न वैज्ञानिकांनी केले आहेत. पक्षी स्थलांतरणाचे चक्र अद्भुत आणि विज्ञानालाही थक्क करणारे आहे. काही पक्षी प्रजाती लाखो मैलांचा प्रवास करतात, तर काहींचा प्रवास मर्यादित आहे. अतिथंड प्रदेशात जलाशये गोठल्याने खाद्याचा शोध, सुरक्षित हवामान आणि घरटी बांधण्यासाठी जागा शोधण्याची कमीत कमी स्पर्धा ही सांगितली जातात. शिवाय यामागचे प्रमुख पर्यावरणीय कारण दिवस आणि रात्रीच्या तासांचे कमी-जास्त होत जाणारे प्रमाण हेच आहे. बदलत्या मोसमानुसार दिवस आणि रात्रीच्या तासांत फरक पडतो आणि पक्ष्यांच्या दिवसभरातील हालचालींवर बंधने येतात, त्यामुळे पक्षी दूरवर स्थलांतरण करतात. जागतिक हवामान बदलांचा अभ्यास, पक्ष्यांमधील संसर्गजन्य रोग आणि जंगल संवर्धनाच्या योजना आखण्यासाठी पक्षी स्थलांतरणाचे महत्त्व असूनही भारतात या पैलूंकडे मोठय़ा प्रमाणात दुर्लक्ष केले जात आहे. ‘बर्ड वॉचिंग’ यापलीकडे मजल मारली जात नसल्याने पक्षी स्थलांतरणाचा देशाच्या वैज्ञानिक आणि शास्त्रशुद्ध पर्यावरणीय अभ्यासाच्या दृष्टीने वापर करून घेतला जात नाही.
पक्ष्यांचे निरीक्षण, नोंदी तसेच रडार आणि उपग्रह निरीक्षणाच्या दृष्टीने पक्षी स्थलांतरण अत्यंत महत्त्वाचे आहे. निरपराध पक्ष्यांची निव्वळ शौकासाठी शिकार करणाऱ्यांची संख्या वाढत आहे आणि यावर केंद्र किंवा राज्य सरकारांचे कोणतेही नियंत्रण नाही.
महाराष्ट्रात येणाऱ्या पक्ष्यांमध्ये घट
ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ. अनिल पिंपळापुरे यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात येणाऱ्या पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. रासायनिक खते, कीटकनाशकांचा अतिरेकी वापर, अवैध मासेमारी, झपाटय़ाने होत असलेला औद्योगिक विस्तार, विद्युत प्रकल्पांची उभारणी आणि सिमेंटीकरण यामुळे स्थलांतरित पक्ष्यांना मुक्कामासाठी जागा मिळत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा