पुण्यात होत असलेल्या जी20 परिषदेला आलेल्या विदेशी पाहुण्यांना भेटवस्तू म्हणून सरस्वती वीणाच्या प्रतिकृती देण्यात येणार असून या वीणांची निर्मिती मिरजेतील तंतूवाद्य कारागिरांनी अवघ्या दहा दिवसात पूर्ण केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यात आज व उद्या जी-२० परिषद होत असून यासाठी विदेशातील प्रतिनिधी पुण्यात आले आहेत. या विदेशी पाहुण्यांना भारतीय संगीताची ओळख व्हावी, अभिजात संगीताचा वारसा ज्ञात व्हावा यासाठी काही भेट वस्तू देण्यात येणार आहेत. या भेटवस्तूमध्ये सरस्वती वीणा देण्याचा निर्णय अंतिम क्षणी घेण्यात आला. सरस्वती वीणा हे वाद्य दक्षिण भारतातील असल्याने याची निर्मितीही दक्षिणेतच होते. मात्र, अल्प वेळेत या भेटवस्तूंची उपलब्धता होणे गरजेचे होते. यामुळे मिरजेत अनेक तंतूवाद्य निर्मात्याकडे १५० सरस्वती वीणाच्या प्रतिकृती तयार करून देण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न करण्यात आले.

अल्प वेळेत एकाच वेळी १५० सरस्वती वीणाच्या प्रतिकृती तयार करण्याचे आव्हान होते. हे आव्हान मिरज म्युझिकल इन्स्ट्रयूमेंट यलस्टरने उचलले व त्यासाठी लागणार्‍या धातूच्या चोचीचे डाय बनवण्यापासून ते वीणाचा साचा बनवण्यापर्यंत अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी सहकार्य केले. मोहिसीन मिरजकर, मुबीन मिरजकर आणि अल्ताफ पिरजादे या तंतूवाद्य  कारागिरांनी आधुनिक तंत्राचा अवलंब करीत  केवळ दहा दिवसात विदेशी पाहुण्यांसाठी १५० सरस्वती वीणाच्या प्रतिकृती तयार करून पुण्याला पाठविल्या आहेत. या निमित्ताने  तंतूवाद्य यलस्टर संकल्पना ही काय आहे हे दहा दिवसात दिसून आले. या निर्मितीमध्ये सीएनसी वर्ल्ड सांगलीचे वाजीम गोलंदाज व डायमेकर श्रीकृष्ण माने, शब्बीर तांबोळी,वीरेश  संकाजे व काही महिला सहकार्‍यांची मदत झाली असल्याचे मिरजकर यांनी सांगितले.