अलिबाग : ‘निसर्ग’ चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेल्या सुपारीच्या बागा पुन्हा उभ्या करण्यासाठी परराज्यातील वाणाची रोपे आणून रायगड जिल्ह्यात वाटली गेली. मात्र ही रोपे श्रीवर्धनच्या जगप्रसिद्ध सुपारीच्या मुळावर उठण्याची भीती निर्माण झाली आहे. परराज्यातील रोपांमुळे सुपारीची मूळ प्रत घसरण्याची शक्यता असून त्यामुळे भविष्यात येथील बागायतदारांना आर्थिक फटका सहन करावा लागण्याची धास्ती वाटते.
रायगड जिल्ह्यात साधारणत: पाच हजार हेक्टरच्या क्षेत्रात सुपारीच्या बागा आहेत. यातून दरवर्षी ३५ ते ४० कोटींची उलाढाल होत असते. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यांतील किनारपट्टीवरील भागात प्रामुख्याने सुपारीची मोठी लागवड केली जाते. रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवर चार वर्षांपूर्वी धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाने ९० टक्के सुपारीच्या बागा भुईसपाट झाल्या. वादळाच्या या धक्क्यातून किमान १० वर्षे बागायतदार सावरू शकणार नाहीत. कारण सुपारीचे एक झाड उत्पादनक्षम होण्यासाठी किमान १० वर्षांचा कालावधी लागतो. त्यावेळची शासनाने १०० टक्के अनुदानावर सुपारीची रोपे पुरवली. ही रोपे परराज्यातून आणण्यात आली. ही रोपे श्रीवर्धनच्या जगप्रसिद्ध रोठा सुपारीसाठी धोकादायक ठरू शकतात अशी बागायतदारांना भीती वाटते. कारण सुपारी हे क्रॉस पालीनेटेड (परपरागण) पीक आहे. परागीभवन प्रक्रिया होताना स्थानिक रोठा सुपारी आणि परराज्यातील सुपारी यांचा संकर होऊन मूळ रोठा सुपारीला याचा फटका बसून मूळ प्रत खालावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
श्रीवर्धनची रोठा सुपारी प्रसिद्ध आहे. या सुपारीत पांढरा भाग जास्त असतो. सुपारीत आरसेक्लोनीन या रसायनाचे प्रमाण कमी असते. इतर सुपाऱ्यांच्या तुलनेत चवीला अधिक चांगली असते.
रोठा सुपारी का महत्वाची
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनची रोटा सुपारी हि प्रसिध्द आहे. या सुपारीत पांढरा भाग जास्त असतो. सुपारीत आरसेक्लोनीन या रसायनाचे प्रमाण कमी असते. इतर सुपाऱ्यांच्या तुलनेत चवीला अधिक चांगली असते. सुगंधी सुपारी आणि पान मसाला उत्पादनासाठी या सुपारीला जास्त मागणी असते. आखाती देश आणि अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशात निर्यात केली जाते.
निसर्गच्या प्रकोपानंतर इथल्या बागायतदारांना परराज्यातील सुपारीची रोपे पुरवली गेली ही अत्यंत चुकीची बाब ठरली आहे. सुपारी हे क्रॉस पॉलीनेटेड (परपरागण) पीक असल्याने इथल्या रोठा सुपारीची प्रत घसरेल. आणि जगमान्यता असलेल्या या सुपारीचा दर्जा घसरून दरही कमी मिळेल. कदाचित ही रोपं पुरवल्यामुळे भविष्यात इथल्या शेतकरयांना मोठं नुकसान सोसावे लागू शकते.
उदय बापट, बागायतदार
श्रीवर्धनच्या कृषी सहाय्यकांना या संदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यावरच यावर भाष्य करता येईल. पण निसर्ग वादळानंतर रत्नागिरी जिल्ह्यातून सुपारीची रोपे रायगड जिल्ह्यात बागायतदारांना देण्यात आली होती. ती वेगळ्या प्रजातीची असली तरी परराज्यातील नव्हती. वंदना शिंदे, कृषी अधिक्षक रायगड