नागपुरात जमावाकडून मारहाण झालेल्या भाजप कार्यकर्त्याकडे गोमांसच असल्याचं स्पष्ट झालं आहे. एफएसएलच्या अहवालात ही माहिती समोर आलीये. दोन दिवसांपूर्वी सलीम इस्माईल शाह याला बेदम मारहाण करण्यात आली होती. सलीम इस्माईल हा मांस विक्रेता आहे. तो त्याच्याकडे असलेल्या दुचाकीच्या डिक्कीमधून मांस घेऊन चालला होता. त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली होती. मात्र सलीमच्या गाडीच्या डिक्कीत असलेलं मांस गोमांस असल्याचं आता समोर आलं आहे.
बुधवारी इस्माईलला झालेल्या मारहाणीनंतर माझ्याकडे गोमांस नव्हतंच असा कांगावा सलीमनं केला होता. त्यानंतर या मांसाचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले होते, फॉरेन्सिक अहवालात दिलेल्या माहितीनुसार सलीमकडे गोमांसच असल्याचं स्पष्ट झालं आहे.
#WATCH: Man beaten up for allegedly carrying beef in Nagpur’s Bharsingi, no arrests have been made yet. #Maharashtra (July 12th) pic.twitter.com/JiFAZMfRSS
— ANI (@ANI_news) July 13, 2017
बुधवारी सलीमला मारहाण केल्याप्रकरणी अश्विन उईके, रामेश्वर तायवाडे, मोरेश्वर तांदूळकर आणि जगदीश चौधरी या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. सलीम शाह बुधवारी नागपुरात आला होता, त्यावेळी त्याच्याकडे गोमांस असल्याचा संशय या चौघांना आला होता आणि त्यांनी सलीमला मारहाण केली होती. आता मात्र सलीमकडे असलेलं मांस हे गोमांसच असल्याचं निष्पन्न झालं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून गोमांस असल्याच्या केवळ संशयावरुन जमावाकडून मारहाण केल्या जात असल्याच्या घटना वाढत आहेत. या मारहाणीमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. गेल्याच महिन्यात जुनैद नावाच्या एका अल्पवयीन मुलाची हरयाणामध्ये हत्या करण्यात आली होती. गोमांस असल्याच्या संशयावरुन जमावाने दिल्लीहून बल्लभगडला परतणाऱ्या जुनैदला जबर मारहाण केली होती. या मारहाणीत जुनैदचा मृत्यू झाला होता.
या घटनेच्या काही दिवसांनंतर झारखंडमधील गिरीदिहमध्ये एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. सुमारे दोनशे लोकांनी मुस्लिम व्यक्तीला जबर मारहाण करत त्याच्या घराला आग लावली. संबंधित व्यक्तीच्या घराबाहेर गाय मृतावस्थेत सापडल्याने जमावाने हे कृत्य केले होते. गोरक्षकांनी गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा पसरवू नये असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं, तरीही अशा घटना थांबलेल्या नाहीत. आता नागपुरात झालेल्या मारहाणीनंतर मांसाचे नमुने जेव्हा लॅबमध्ये पाठवण्यात आले तेव्हा सलीमकडे मांस असल्याचंच स्पष्ट झालं आहे. आता पोलीस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.