गोवा ते मध्य प्रदेश असे जाणारे आफ्रिकन व इंडियन चंदन आंबोली या ठिकाणी जप्त करून वनकायद्याचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वनखात्याने दिली. सुमारे सात हजार किलो चंदन खासगी मालवाहतूक शिक्का मारला नसल्याने जप्त करण्यात आला आहे.
वनसंरक्षण, अतिक्रमण व निर्मूलन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक प्रकाश बागेवाडी यांनी याप्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७चे कलम ४१ अंतर्गत मुंबई वन नियम १९४२च्या ८२ क नुसार ही कारवाई दुयानी सलल इंडस्ट्रीज काणकोण यांच्या विरोधात केल्याचे सांगितले.
आंबोली वनखात्याच्या चेक पोस्टवर गोवा ते मध्य प्रदेश जाणारा आयशर टेम्पो तपासणीसाठी थांबविण्यात आला. त्याच्याकडे गोवा वनखात्याचा पास होता. त्यातील सुमारे सात हजार किलो आफ्रिकन व इंडियन चंदनाची चौकशी करण्यात आली. टेम्पोत गोणपाट पिशवीत हे चंदन होते.
चंदनाचे लाकूड कोणत्याही भागात वाहतूक करावयाचे असल्यास खाजगी प्रॉपर्टी वाहतूक शिक्का मारणे आवश्यक होते. तसा शिक्का चंदनाचे लाकूड व पासावर मारण्यात आला नव्हता. वनखात्याच्या चौकशीत ही बाब आढळली, त्यामुळे वनकायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली.
आफ्रिकेतून मुंबईच्या न्हावा शेवा बंदरात आलेले हे चंदन तेथून गोवा काणकोण या ठिकाणी रस्ता वाहतुकीने नेण्यात आले होते. तेव्हा दुमानी सतत इंडस्ट्रीज काणकोणकडे योग्य ते पास होते असे वनखात्याच्या चौकशीत उघड झाल्याचे सांगण्यात आले.
काणकोण भागात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने र्निबध आले आहेत, त्यामुळे हे चंदन मध्य प्रदेश येथे प्रक्रियेसाठी नेण्यात येत होते असे वनखात्याच्या चौकशीत उघड झाले.
आफ्रिकन व इंडियन चंदन दीड कोटीचे असल्याचे म्हटले गेले होते, पण सध्या त्याची बाजारात किंमत सुमारे २५ लाखांच्या जवळपास असावी असे सांगण्यात येते. आफ्रिकन व इंडियन सात हजार किलो चंदन व पासवर खासगी मालकीच्या कंपनीचे सील नसल्याचे उघड झाल्याने गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा