महाराष्ट्राच्या वन खात्याने वन्यजीव व जंगल संरक्षणासाठी पश्चिम बंगालमधील इसापूर शस्त्र कारखान्यातून ८८ पिस्तुलांची खरेदी केली असून ही शस्त्रे गेल्या १ एप्रिलला नागपुरात आणण्यात आली. महाराष्ट्राच्या वन खात्याने शस्त्र खरेदीचा प्रस्ताव गेल्या वर्षी इसापूर शस्त्र निर्मिती कारखान्याच्या महाव्यवस्थापकांकडे पाठविला होता. मूल्यवर्धित कराचे नवे दर १ एप्रिलपासून लागू होणार असल्याने त्यांनी सदर शस्त्रसाठी ३१ मार्च २०१३ पूर्वी उचलण्याची सूचना एका पत्राद्वारे महाराष्ट्र सरकारला केली होती. त्याची दखल घेऊन वन विभागाचे एक पथक विभागीय वन अधिकारी टी.डी. मसराम यांच्या नेतृत्त्वाखाली इसापूरला पाठविण्यात आले होते. शस्त्रे विमानातून आणावयाची असल्याने त्यासाठी नागरी उड्डयन संचालनालयाची पूर्वपरवानगी घेण्यात आली. त्यानंतर गेल्या १ एप्रिलला ही शस्त्रे कोलकाता विमानतळावरून नागपूरला आणण्यात आली. सशस्त्र सेनादलाच्या देखरेखीखाली ही शस्त्रे ठेवण्यात आली होती. नागपूर विमानतळावर राज्य राखीव पोलीस दलाच्या अखत्यारित देण्यात आलेली ही शस्त्रे आता नागपूर ग्रामीण पोलिसांच्या कस्टडीत ठेवण्यात आली आहेत.
महाराष्ट्रातील ११ वन विभागांच्या गरजेनुसार अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) देवेंद्रकुमार यांच्या अखत्यारित पिस्तुलांचे वितरण केले जाणार असल्याचे वन विभागाच्या नागपूर मुख्यालयातील सूत्रांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.