लोकसत्ता वार्ताहर
सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथे हत्तीच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी गावात आलेल्या अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींना तब्बल दहा तास रोखून धरले. यानंतर वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हत्ती पकड मोहीम हाती घेण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर सुटकेचा निःश्वास सोडला.
दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावात धुमाकूळ घालणाऱ्या जंगली हत्तीने काजू बागेत जाणाऱ्या लक्ष्मण यशवंत गवस (६५) यांच्यावर हल्ला चढवून बळी घेतला होता. त्यामुळे संतप्त मोर्ले गावातील ग्रामस्थ यांनी गावात आलेल्या सर्व प्रशासकीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी याना गावात रोखून धरले होते. जोपर्यंत हत्ती पकड मोहीम आदेश तातडीने नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत शासकीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधींची वाहने रोखून ठेवली यावेळी रस्त्यावर लोक ठाण मांडून बसले तसेच वाहने रस्त्यावर आडवी ठेवून रस्ता रोखून धरला.
मोर्ले ग्रामस्थांनी घेतलेला पवित्रा पाहून राज्य सरकार तसेच नागपूर मुख्य वनसंरक्षक कडून मोर्ले गावातील ओंकार टस्कर हत्तीला प्रशिक्षीत हत्तींच्या मदतीने बेशुद्ध करून पकडले जाईल असे लेखी आश्वासन दिले.नागपूर येथील मुख्य वन्य जीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास राव यांनी मोर्ले गावातील एकमेव ओंकार टस्कर हत्तीला जेरबंद करा असा आदेश जाहीर केला. या नंतर आंदोलन मागे घेत वन अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलीस अधिकारी लोकप्रतिनिधी यांचा मार्ग मोकळा केला.
हत्ती हल्यात ठार झालेल्या लक्ष्मण गवस याना तातडीने दहा लाख रुपये व इतर रक्कम दोन महिन्यात देण्याचे वन विभागाने कबूल केले. यामुळे मोर्ले गावातील ग्रामस्थ यांनी आंदोलन मागे घेत मृतदेह ताब्यात घेतला. गेल्या वीस वर्षांपासून त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. यापुर्वी हत्तीने पाच वेळा शेतकऱ्यांवर हल्ला केला होता. त्यातून ते बचावले होते.पण आजच्या सहाव्या हल्ल्यात काजू बागेत सकाळीच आलेल्या शेतकऱ्याला जीव गमावला लागला.