सोमवारी साजर्या होत असलेल्या नागपंचमी वेळी जिवंत सर्पाची हाताळणी होउ नये यासाठी वन विभागाने शिराळ्यासह इस्लामपूर व वाळवा परिसरात १२ गस्ती पथके तैनात केली असल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांनी शुक्रवारी दिली. शिराळा येथे नागपंचमीदिवशी जिवंत नागपूजा करण्याची प्रथा होती. मात्र, सर्वोङ्ख न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर गेली काही वर्षे या प्रथेवर बंधने आली आहेत. सर्प हाताळणी, प्रदर्शन होउ नये यासाठी वन विभाग, प्राणीमित्र प्रयत्नशील असून यासाठी गाव पातळीवर पथनाट्य, शाळामध्ये चित्र प्रदर्शन, व्याख्याने या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
हेही वाचा >>> फळविक्रेत्या मोहम्मदने भरबाजारात इसमाचे दोन्ही हात छाटले; नांदेडमधील भीषण हल्ल्याचं कारण ठरलं..
तथापि, काही मंडळीकडून अद्याप नाग सर्पांची हाताळणी होत असल्याचे वेळोवेळी आढळून आले आहे. यामुळे सतर्क झालेल्या वन विभागाने शिराळा शहरासह ग्रामीण भागातही ध्वनीवर्धकावरून सर्प हाताळणी करण्यास कायद्यानुसार बंदी असल्याची माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच नागपंचमीच्या निमित्ताने चोरून होणारी सर्प हाताळणी रोखण्यासाठी १२ पथके तैनात करण्यात आली आहेत. नागपंचमी दिवशी चलचित्रीकरणाचे कॅमरे या पथकासोबत ठेवण्यात आले आहेत. सुमारे १५० कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. यंदा प्रथमच वाळवा आणि इस्लामपूरमध्ये गस्ती पथकाची करडी नजर राहणार आहे. याशिवाय नागपंचमीच्या पूर्व संध्येला रविवार दि. २० ऑगस्ट रोजी शिराळा शहरात पोलीस व वन कर्मचारी यांचे संचलन होणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.