स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवींची वनखात्यातील घुसखोरी गेल्या काही वर्षांत चर्चेचा विषय ठरली आहे. वनखात्यातील अधिकाऱ्यांशी जवळीक साधून त्यांना मर्जीत आणायचे आणि मग कायम अधिकाऱ्यांना ताटाखालच्या मांजरीसारखे वागवायचे. स्थानिक रेशीमबाग मैदानावरील हत्तीच्या प्रकरणाने पुन्हा एकदा स्वयंसेवी आणि स्वयंसेवी संस्थांच्या वनखात्यातील घुसखोरीचा चेहरा उघड केला आहे.
राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनीच नगरपालिका आणि तत्सम शहरात हत्तीच्या संचारास मनाई करणारे आदेश डिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात काढले. त्यानंतर लागलीच ३१ डिसेंबरला रेशीमबाग मैदानावर एका धार्मिक कार्यक्रमासाठी हत्ती आणले. मात्र, कायद्याचा बडगा दाखवत ज्या पीपल्स फॉर अ‍ॅनिमल्स या संस्थेने तक्रार नोंदवली, त्याच संस्थेने न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करण्यास वनाधिकाऱ्यांना भाग पाडले. या संस्थेच्या प्रमुख असलेल्या केंद्रीय मंत्र्यांचा धाक दाखवून आणि वनखात्याचे माजी सचिव आणि मुख्यमंत्र्यांच्या माजी सचिवांकडून भ्रमणध्वनी करवून कायद्याच्या आदेशान्वये जाणाऱ्या हत्तीची वाट अडवली. हा प्रकार वनमंत्र्यांच्या कानावर जाताच त्यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि मुख्य वनसंरक्षकांना कायद्याचा आदेश, वनाधिकाऱ्यांची अधिकारकक्षा आणि स्वयंसेवीची सीमारेषा याचा पाठ शिकवला. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि मुख्य वनसंरक्षकांना स्वयंसेवी संस्थेच्या सांगण्यावरून अडवण्यात आलेली हत्तीची वाट मोकळी करावी लागली. मात्र, या घटनेने वनखात्यातील स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवींच्या घुसखोरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवी या प्रकारात मोडतील, असे नाही. मात्र, अलिकडच्या काही वर्षांत वन्यजीवांचे आपणच कर्तेधर्ते आहोत, अशा अविर्भावात अनेकांनी संस्था स्थापन केल्या. त्या संस्थांना विदेशातून निधी मिळावा, याकरिता अभयारण्याच्या क्षेत्रसंचालकांशी सलगी करून काम दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
प्रामाणिकपणे काम करणाऱ्या स्थानिक स्वयंसेवींना दूर सारून स्वत: अभयारण्यात घुसखोरी करण्याचे प्रकारही वाढले आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव संवर्धनाच्या नावाखाली सर्रास अशा स्वयंसेवीची घुसखोरी सुरू आहे. पर्यटकांसाठी नियम लावायचे आणि स्वयंसेवींना मोकाटपणे आत सोडण्याचा प्रकार याच व्याघ्रप्रकल्पात नव्हे, तर नागझिरा-नवेगाव अभयारण्यातही अलिकडच्या काही महिन्यात सुरू झाला आहे. आता हेच स्वयंसेवी वनाधिकाऱ्यांना स्वत:च्या तालावर नाचवत आहेत. वनमंत्र्यांच्या कठोर भूमिकेमुळे हत्तीच्या या प्रकरणाचे स्वयंसेवींचा खरा चेहरा उघडकीस आला आहे. त्यामुळे आता
तरी अधिकारी त्यांच्या अधिकाराचा वापर करणार की स्वयंसेवीच्या तालावर नाचणार, हे येत्या काळातच कळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा