जालना : बाहेच्या जिल्ह्यातून विक्रीसाठी आणलेले जीवंत खवले मांजर आणि तीन महागडी वाहने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जालना शहरात जप्त केल्या आहेत. या प्रकरणातील सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अन्य जिल्हयातील नैसर्गिक अधिवासात असलेले खवले मांजर पकडून हे जालना येथे विक्रीसाठी आणल्यात आहे होते. बनावट ग्राहक तयार करून ही कारवाई करण्यात आली.
खवले मांजर विक्रीसाठी वाशिम जिल्हयातील एक व्यक्ती जालना शहरात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिका-यांना मिळाली होती. ही व्यक्ती जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात आली होती. वनविभागाच्या अधिकायांनी त्याच्याकडून खवले मांजर खरेदी करण्यासाठी बनावट ग्राहक तयार ठेवले होते. या व्यक्तीने बनावट ग्राहकांना चारचाकी वाहनात ठेवलेले खवले मांजर दाखविले आणि त्याच वेळी वनविभागाच्या पथकाने छापा मारून खवले मांजर ताब्यात घेतले.
यासंदर्भात वनविभागाच्या पथकाने सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. खवले मांजर ठेवलेले चारचाकी वाहन त्याचप्रमाणे अन्य दोन प्रवासी वाहने जप्त करण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांपैकी संजय उकेंडा राठोड (रा. गिरोली), प्रताप गुलब सरनाईक (रा. हिवरा), अनिल अशोक सावळे (रा. ढोरखेडा), एकनाथ अनिल इंगळे (रा. लाखन) हे वाशिम जिल्हयातील आहेत. तर नारायण पुंजाराम अवचार हा जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यातील विडोळी (ता मंठा) येथील रहिवासी आहे. तर अटक करण्यात आलेला अन्य एक आरोपी सुनील नामदेव थोरात हा हिंगोली जिल्ह्यातील चौंडी (ता. वसमत) येथील रहिवाशी आहे.
नैसर्गिक अधिवासातून खवले मांजर पकडणे, त्याची अवैध वाहतूक करणे, अवैध खरेदी-विक्री करणे या आरोपावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयातील एक वाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जालना येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरातून जप्त केले आहे. खवले मांजराची विक्री करण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्याने जालना येथील वनविभागाच्या अधिकाऱ्याऱ्यांनी बनावट खरेदीदार तयार करून खवले मांजराचे तीस लाख रुपये देतो असे सांगून आरोपीस जालना येथे बोलावून घेतले होते. यामागे एखादे मोठे रॅकेट असल्याचा संशय असून वनविभागाचे अधिकारी त्यासंदर्भात तपास करीत आहेत.