सांगलीतील कुपवाड परिसरामध्ये गेल्या पाच दिवसापासून वनविभागाला चकवा देणाऱ्या सांबराला रेस्क्यू ऑपरेशन करत पकडण्यात अखेर वन विभागाला यश आले आहे. यासाठी वन विभागाचे पथक गेल्या पाच दिवसापासून दिवस रात्र रेस्क्यू ऑपरेशन मध्ये होते. बुधवारी पहाटेच्या सुमारास वनविभागाने या सांबराला पकडले .
पाच दिवसापासून आपल्या नैसर्गिक अधिवासातून भरकटत आलेले हे सांबर पकडण्यासाठी वन विभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू होते. यासाठी वनविभागाच्या उपवनसंरक्षक नीता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची सर्व टीम , प्राणिमित्र हे या सांबराला रेस्क्यू करण्यासाठी गेले होते. पाच दिवस प्रयत्न करत होते मात्र दोन वेळा हाती आलेले हे सांबर वनविभागाच्या हातातून निसटले होते.
पाच दिवस या सांबराचा मुक्काम हा कुपवाड परिसरातील भारत सूतगिरणीच्या बंदिस्त आवारात होता मात्र तरीही चार दिवस हे सांबर वनविभागाच्या हाती लागत नव्हतं अखेर आज बुधवारी पहाटेच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्राणिमित्रांच्या मदतीने या सांबराला रेस्क्यू करत त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले आहे. पाच दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर हे सांबर ताब्यात आल्यामुळे वन विभागाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. त्याचबरोबर या सांबराची वैद्यकीय चाचणी करून त्याला चांदोली अभयारण्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.