गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर-डिसेंबरदरम्यान विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये बहेलिया टोळ्यांचा शिरकाव झाल्याचा ‘अ‍ॅलर्ट’ जारी झाल्यानंतरही बहेलियांच्या शिकारी टोळ्यांचा ठावठिकाणा शोधण्याऐवजी वन कर्मचाऱ्यांवर अन्य प्रशासकीय कामांचा अतिरिक्त बोजा लादण्यात येत आहे. परिणामी विशेष व्याघ्र संरक्षण दलासह अन्य साधने उपलब्ध असतानाही शिकारी टोळ्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यावरून वन कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित झाले आहे. याचा फायदा शिकारी टोळ्यांनी घेतल्याने विदर्भातील वाघांच्या शिकारीची व्यूहरचना करणारे रणजित सिंग आणि सरजू हे दोन सूत्रधार फरारी झाले आहेत.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘टार्गेट’ पूर्ण करण्याचे काम लादल्याने ग्राम विकास, पुनर्वसन, सिलिंडर वाटपाच्या नोंदी, कार्यशाळा अशा कामांमध्ये वन कर्मचाऱ्यांना व्यस्त ठेवण्यात येत आहे. याचा विपरीत परिणाम गस्तीवर आणि शिकारी टोळ्यांचा माग घेण्यावर झाला आहे. पहिल्यांदाच वाघांची थेट शिकार करणाऱ्या बहेलियांची टोळी महाराष्ट्र वन विभागाच्या हाती लागली. त्यामुळे मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थानातील वनाधिकाऱ्यांनी त्यांच्या राज्यातील बेपत्ता वाघांच्या चौकशीसाठी नागपुरात धाव घेतली. परंतु, त्यांच्या हाती जुजबी चौकशीपलीकडे काहीही लागलेले नाही. राजस्थानातील नऊ वाघ बेपत्ता आहेत. त्यांच्या शिकारीचा संशय असल्याने राजस्थानचे अधिकारी या आरोपींची चौकशी करून गेले.
आरोपींनी वाघाला पकडण्याचे सापळे, शिकारीची जागा, वाघाच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली याची कबुली दिली आहे. मात्र, प्रत्यक्ष वाघाची कातडी खरेदी करणारे दोन्ही सूत्रधार अद्यापही फरार असल्याने वन विभागाच्या चौकशीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचा बडगा आल्यानंतर राज्य सरकारांनीही यंत्रणा सक्रिय केल्याने बहेलिया टोळ्यांनीही त्यांचे शिकारीची कार्यपद्धती बदलली आहे. स्थानिक लोहारांना हाताशी धरून सापळे बनविले जातात, सापळे आणि अन्य साहित्य एखाद्याच्या घरी दडवून ठेवले जाते आणि नंतर ते जंगलात स्थानिकांच्याच माध्यमातून पोचवले जाते, त्यामुळे बहेलिया लोकांविरुद्धचे पुरावे हाती लागत नाहीत. पाच आरोपींची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली असून, त्यांच्याविरुद्धचा खटला सबळ पुराव्यांनिशी सादर न झाल्यास या आरोपींना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी भीती वन्यजीव संरक्षण संस्थांनी व्यक्त केली आहे.
 आरोपी व्याघ्र प्रकल्पाच्या साधारण ५० ते १०० किमी परिसरात मुक्काम करतात. शिकारीची प्रकरणे बफर झोनमधीलच आहे. संरक्षित क्षेत्रापर्यंत शिकारी पोहोचत नाही. अटकेतील आरोपींचे सीडीआर तपासल्यानंतर त्यांनी दोन्ही फरार आरोपींशी सातत्याने संपर्क साधल्याचे स्पष्ट झाले आहे. रेकीचा बहुतांश भाग पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रातील असल्याने पेंचवर बहेलियांनी लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. यात खापा, आमडी, मनसर, उमरेड, कांद्री आणि पवनीत त्यांचा अधिक वावर राहिलेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाघीण तीन बछडय़ांसह बेपत्ता
पेंचमधील एक वाघीण तीन बछडय़ांसह बेपत्ता असून, तिच्या अस्तित्वाचे कोणतेही पुरावे कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये आलेले नाहीत. ही वाघीण पेंच व्याघ्र प्रकल्पातील फेफरीकुंड भागातून गेल्या १ जूनपासून बेपत्ता असून तिच्या शोधासाठी वन कर्मचाऱ्यांना कामास भिडवण्यात आले आहे. परंतु, याविषयी काहीही बोलण्यास प्रकल्प संचालक एस. रेड्डी यांनी नकार दिला. 

वाघीण तीन बछडय़ांसह बेपत्ता
पेंचमधील एक वाघीण तीन बछडय़ांसह बेपत्ता असून, तिच्या अस्तित्वाचे कोणतेही पुरावे कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये आलेले नाहीत. ही वाघीण पेंच व्याघ्र प्रकल्पातील फेफरीकुंड भागातून गेल्या १ जूनपासून बेपत्ता असून तिच्या शोधासाठी वन कर्मचाऱ्यांना कामास भिडवण्यात आले आहे. परंतु, याविषयी काहीही बोलण्यास प्रकल्प संचालक एस. रेड्डी यांनी नकार दिला.