बांबू चांगल्याप्रकारे जगवायचा असेल तर त्यासाठी सरासरी २३ अंश सेल्सिअस तापमानाची गरज आहे. इतर प्रांतातील आणि विदेशातील बांबूच्या जाती जगवताना तरी तापमानाशी मुळीच तडजोड केली जाऊ शकत नाही. विदर्भात दरवर्षी पारा ४५ अंश सेल्सिअस तापमान ओलांडतो. तरीही एका साध्या वनपालाने त्यांच्या २० वर्षांच्या मेहनत पणास लावत ४७ अंश सेल्सिअस तापमानात देशविदेशातील ५५ बांबूच्या जाती जगवल्या. त्याच्या या मेहनतीचे फलित म्हणजे अमरावती जिल्ह्यातील वडाळीचे बांबू संगोपन व संवर्धन केंद्र हे देशातील सर्वात मोठे केंद्र होण्याच्या मार्गावर आहे.
बांबूच्या एका रोपटय़ापासून १०० रोपटी तयार होतात, पण त्यासाठी आधी हे एक रोपटे जगवणे महत्त्वाचे.
डेहराडूनला देशातील सर्वात मोठे ब्रिटिशकालीन वनसंशोधन केंद्र आहे. या केंद्रात बांबूला लागणारे हवामान व माती सर्व काही उपलब्ध आहे. त्यामुळे जगातील सुमारे १५०० बांबू जाती या केंद्रात असायला हव्या होत्या. मात्र, तेथील ३६ बांबू जातींपैकी केवळ २७ जाती तग धरून आहेत. बांबूची शेती केली तर एकरी १२ हजार ५०० रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळते. पश्चिम व पूर्व भागांत, तसेच नागालँड व इतर भागांत शेती नाही, पण बांबूच्या भरवशावर तेथील लोक चांगल्या प्रकारे आयुष्य जगत आहेत, पण नकारात्मक विचारात अडकलेला महाराष्ट्रातला विशेषत: विदर्भातला शेतकरी त्याकडे सकारात्मक दृष्टीने पहायलाच तयार नाही. वडाळीच्या या केंद्रातही सलीम अहमद यांनी या परिस्थितीवर मात करीत जोमाने प्रयोग सुरू करून आज मेहनतीच्या बळावर यश पटकावले आहे. विदेशातून बांबू रोप मागवणे खरे तर कठीणच. सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडताना सहा-सहा महिन्यांचा कालावधी लोटतो. तरीही, सलीम अहमद यांनी ते केले. मात्र, खेदाची बाब म्हणजे एक वनपाल स्वबळावर हे सर्व करत असताना वनखात्याचे मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.
सलीम अहमद यांनी विकसित केलेल्या वडाळीच्या या नर्सरीत नजर जाईल तिकडे बांबूचे बन दिसून येते. तब्बल २५० मोरांचा थवा तेथे वास्तव्याला आहे. देशविदेशातील प्रजातीचे संगोपन त्यांनी केले एवढेच नव्हे, तर त्या जगवल्या आणि वाढवल्यासुद्धा. प्रजातीच्या अदलाबदलीसाठी त्यांना दक्षिण भारतातून प्रस्ताव आला आहे. मात्र, पुन्हा तीच वनखात्याची मानसिकता आड येत आहे.
भारतात बांबूच्या १३४ जाती
जगभरात सुमारे १५०० हजार बांबू जातींपैकी सर्वाधिक ३५० जाती चीनमध्ये आहेत. भारतात बांबूच्या १३४ जाती, तर १८ प्रजाती आहेत. त्यापैकी १२५ भारतीय आणि ९ परदेशातील आहेत.
वनपालाने फुलवले ५५ जातींच्या बांबूंचे बन!
बांबू चांगल्याप्रकारे जगवायचा असेल तर त्यासाठी सरासरी २३ अंश सेल्सिअस तापमानाची गरज आहे. इतर प्रांतातील आणि विदेशातील बांबूच्या जाती जगवताना तरी तापमानाशी मुळीच तडजोड केली जाऊ शकत नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-08-2014 at 04:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest guard planted 55 types of bamboo in vidarbha