गेल्या दोन महिन्यांत वाघ व बिबटय़ांच्या हल्ल्यात ११ नागरिक ठार तर पाच महिन्यांत तीन वाघ व दोन बिबटय़ांचे मृत्यू अशी आणीबाणीची परिस्थिती चंद्रपूर जिल्ह्य़ात उद्भवली असताना वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांना चंद्रपूर दौरा करण्यासाठी थोडीसुद्धा सवड मिळालेली नाही. मानव-वन्यजीव संघर्षांचा हा चढता आलेख वनमंत्र्यांना कदाचित दिसलेला नसावा, अशी उपहासात्मक टीका पर्यावरणवाद्यांच्या वर्तुळातून केली जात आहे. ताडोबाच्या बफर झोनमध्ये मानवाला लक्ष्य करणाऱ्या या प्राण्यांनी आता या चंद्रपूर शहराच्या शेजारी धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. गेल्या तीन दिवसांच्या घटनांत बिबटय़ाने दोघांना ठार केले. आज ब्रह्मपुरीत एका वाघाने महिलेचा बळी घेतल्याचे आढळून आले. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात माणसे मरत असताना पतंगराव कदम गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे ग्रामीण भागात कमालीची दहशत पसरली आहे. आता त्याचे लोण शहरी भागात आले आहे. ताडोबाच्या बफर झोनमध्ये बिबटय़ाने धुमाकूळ घालायला सुरुवात केल्यानंतर वनखाते खडबडून जागे झाले. या बिबटय़ाला पकडण्यासाठी अनेक पिंजरे या भागात लावण्यात आले. वनखात्याचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी येथे येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. दहशतीत असणाऱ्या काही गावांना भेटी दिल्या. नंतर आठ दिवसांनी मोहुर्लीत एक कार्यशाळा घेतली. वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. मात्र, वन्यप्राण्यांच्या घुसखोरीला आळा घालण्यात वनखाते सपशेल अपयशी ठरले आहे.
मानवाचा जंगलात वाढलेला वावर व वन्यप्राण्यांची वाढलेली संख्या यामुळे या संघर्षांत वाढ झाली असली तरी वनखात्याने सध्या राबवलेल्या उपाययोजना या संघर्षांच्या मुळाशी जाणाऱ्या नाहीत. यासंदर्भात काही धोरणात्मक निर्णय सरकारने घेणे भाग असतानासुद्धा पतंगराव कदम यांनी मौन बाळगले आहे. दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या संघर्षांत केवळ नागरिकच ठार झाले नाहीत तर वन्यप्राण्यांचेसुद्धा बळी गेले आहेत. गेल्या पाच महिन्यांचा आढावा घेतला तर तीन वाघ मृत्युमुखी पडले आणि दोन बिबटय़ांनाही जीव गमवावा लागला. या दोन्ही बिबटय़ांना सावली तालुक्यातील गावकऱ्यांनी ठार मारले. त्याआधी त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला होता. सावली परिसरात वाघ व बिबटय़ाने मानवावर हल्ले करणे सुरू केल्यानेच संतप्त झालेल्या नागरिकांनी हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले. एकूणच सततच्या घटनांमुळे या जिल्हय़ातील स्थिती स्फोटक बनली असताना वनमंत्री यांनी आजवर दौरा करण्याची साधी तसदीसुद्धा घेतली नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या संदर्भात कदम यांच्या मंत्रालयातील कार्यालयात संपर्क साधला असता ते भारती विद्यापीठाच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे गेल्या वर्षीचा उन्हाळा वाघांच्या शिकारींनी गाजला होता. तेव्हाही कदम यांनी सुरुवातीला दौरा केला नव्हता. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रश्नावर दौरा करण्याचे जाहीर करताच कदम त्यांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी घाईघाईत येथे येऊन गेले. या पाश्र्वभूमीवर आताही ते राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या घोषणेची वाट बघत आहेत काय असा सवाल पर्यावरणप्रेमी संघटनांकडून केला जात आहे.
ताडोबात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र; वनमंत्र्यांना भेट देण्यास वेळच नाही
गेल्या दोन महिन्यांत वाघ व बिबटय़ांच्या हल्ल्यात ११ नागरिक ठार तर पाच महिन्यांत तीन वाघ व दोन बिबटय़ांचे मृत्यू अशी आणीबाणीची परिस्थिती चंद्रपूर जिल्ह्य़ात उद्भवली असताना वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांना चंद्रपूर दौरा करण्यासाठी थोडीसुद्धा सवड मिळालेली नाही. मानव-वन्यजीव संघर्षांचा हा चढता आलेख वनमंत्र्यांना कदाचित दिसलेला नसावा,
First published on: 11-05-2013 at 02:03 IST
TOPICSपतंगराव कदम
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest minister patangrao kadam has no time to visit chandrapur to discuss forest issue