रोहयोच्या कामात झालेल्या १२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याऐवजी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न वनखात्यात सुरू झाला आहे. यासंदर्भात प्रधान सचिवांनी दिलेले चौकशीचे आदेशही अधिकारी पाळत नसल्याची बाब समोर आली आहे.
गडचिरोली वनवृत्तातील वडसा वनविभागात गेल्या चार वर्षांत रोजगार हमी योजनेची कामे करताना वनखात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून सुमारे १२ कोटींचा गैरव्यवहार केल्याची बाब ‘लोकसत्ता’ने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान उघडकीस आणली होती. वनखात्याचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी या वृत्ताची दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक नकवी यांना दिले होते. नकवी यांनी विशेष अधिकारी नेमून या प्रकरणाची चौकशी करावी आणि या गैरव्यवहारात दोषी आढळलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, असा आदेश परदेशी यांनी दिला होता. हे आदेश देऊन पंधरवडा लोटला तरी अद्याप या गैरव्यवहाराची चौकशी सुरू झालेली नाही.
या वनवृत्ताचे प्रशासकीय प्रमुख असलेले अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक बीएसके रेड्डी चौकशी करतील, असे आधी ठरले होते. त्यांनाही अद्याप वेळ मिळालेला नाही. गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक टीएसके रेड्डी यांनी दक्षता विभागाचे उपवनसंरक्षक हलमारे यांना चौकशीसाठी पाठवले. ते वडसा विभागात ज्या तीन परिक्षेत्रात हा गैरव्यवहार झाला तेथे जाऊन आले. मात्र, त्यांनी कोणत्याही कागदपत्रांची पाहणी केली नाही किंवा संशयास्पद कागदपत्रे जप्त केली नाहीत. आता या गैरव्यवहारात सहभागी असलेल्या वनाधिकाऱ्यांना,‘अपूर्ण कामे पूर्ण करा आणि गैरव्यवहाराशी संबंधित सर्व कागदपत्रे नष्ट करा,’ असे आदेश गडचिरोलीतील अधिकारी देत असल्याची माहिती समोर आली आहे.
वडसा विभागातील वनाधिकाऱ्यांनी कुरखेडा येथे बेकायदेशीर कार्यालय उघडून त्या माध्यमातून हा गैरव्यवहार केला. या कार्यालयात काम करणाऱ्या तरुणांच्या नावावर कोटय़वधींची देयके काढण्यात आली. हे कार्यालय अजूनही सुरू असल्याचे आता निदर्शनास आले आहे. वडसाचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनीही या कार्यालयाला अद्याप भेट दिलेली नाही. आता गडचिरोली व वडसातील अधिकाऱ्यांकडून निर्देश मिळताच या भागात झालेली बोगस कामे सुधारण्याचा कार्यक्रम स्थानिक अधिकाऱ्यांनी हाती घेतला आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे. हा प्रकार प्रकरण दडपण्याचाच असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे. यासंदर्भात नकवी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा