नक्षलवादामुळे संवेदनशील समजल्या जाणाऱ्या गडचिरोली वनवृत्तात रोजगार हमी योजनेच्या कामात झालेल्या १२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात सहभागी होण्यास नकार देणाऱ्या एका वनाधिकाऱ्यालाच निलंबित करण्याचा प्रकार वनखात्यात घडला आहे. यामुळे स्वच्छ प्रशासनाचा दावा करणारे या खात्याचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी अडचणीत आले आहेत.
गडचिरोली वनवृत्तातील वडसा वनविभागात पुराडा, कोरची व मालेवाडा या क्षेत्रात गेल्या चार वर्षांंत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कोटय़वधींची कामे करण्यात आली. ही कामे करताना कोणतेही निकष पाळण्यात आले नाही. कुरखेडा येथे अवैधपणे कार्यालय थाटून अधिकाऱ्यांनी आपल्या हस्तकांकरवी कामे करवून घेतली. या कार्यालयात काम करणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या नावावर कोटय़वधींची देयके काढण्यात आली. या गैरव्यवहाराचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ने हिवाळी अधिवेशनाच्या काळात प्रकाशित केले. त्याची दखल घेत खात्याचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी चौकशीचे आदेश जारी केले. नागपुरातील वन मुख्यालयात कार्यरत असलेले अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक बी. एस. के. रेड्डी यांच्याकडे चौकशीची जबाबदारी देण्यात आली.
प्रत्यक्षात रेड्डी यांनी एकदाही या भागाला भेट दिली नाही. गेल्या दोन महिन्यांपासून हे प्रकरण गाजत असूनसुद्धा रेड्डी तसेच गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी यांनी साधी चौकशी करण्याचे सुद्धा टाळले. आता या गैरव्यवहारात सहभागी होण्यास नकार देणारे कोरचीचे वनाधिकारी कुरेशी यांना निलंबित करण्याचे आदेश गुरुवारी रात्री जारी करण्यात आल्याने या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. हा गैरव्यवहार घडला त्या काळात कुरेशी कोरचीला कर्तव्यावर नव्हते. त्यांची कोरचीला बदली झाल्यानंतर त्यांनी या गैरव्यवहाराची माहिती वडसाचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी व गडचिरोलीचे वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी यांना पत्र लिहून कळवली. या पत्रांमध्ये,‘रोहयोशी संबंधित अनेक देयके चुकीच्या पद्धतीने मंजूर करण्यात आलेली आहेत, वस्तूंचा पुरवठा झालेला नसताना सुद्धा कोटय़वधींची देयके मंजुरीसाठी देण्यात आली आहेत,’ असे स्पष्टपणे नमूद होते.
या पत्राची दखल वरिष्ठांनी घेतली नाही. उलट कुरेशी यांनाच शांत बसण्याचा सल्ला देण्यात आला. कुरेशी कोरचीत कार्यरत असेपर्यंत देयके मंजूर होणार नाहीत हे लक्षात येताच या गैरव्यवहाराच्या सूत्रधारांनी वनखात्यातील कर्मचाऱ्यांनाच कुरेशी यांच्याविरुद्ध आंदोलन करण्यास भाग पाडले. सुमारे १५ दिवस चाललेल्या या आंदोलनाचा आधार घेऊन आता कुरेशी यांना निलंबित करण्यात आले आहे. कुरेशी यांनी या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचे ठरवले असून, वनखात्याचे प्रमुख नकवी यांना एक पत्र पाठवले आहे. या गैरव्यवहाराशी कोणताही संबंध नसताना केवळ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात चौकशीची जबाबदारी असलेले अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक बी. एस. के. रेड्डी यांना वारंवार विचारणा करूनसुद्धा त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Feb 2014 रोजी प्रकाशित
गैरव्यवहारास नकार देणारा वनाधिकारी निलंबित
नक्षलवादामुळे संवेदनशील समजल्या जाणाऱ्या गडचिरोली वनवृत्तात रोजगार हमी योजनेच्या कामात झालेल्या १२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात सहभागी होण्यास
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 22-02-2014 at 12:04 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest officer suspended because they refused to participate in scam