– धवल कुलकर्णी
सिंहगडचा लढाईमध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांनी यशवंती नावाच्या एका घोरपडीच्या साह्याने कोंढाणा म्हणजे सिंहगड चा किल्ला सर करून मोगलांना पाणी पाजलं होतं, असं म्हणण्यात येतं. दुर्देवी बाब अशी की आज याच घोरपडी एक लढाई लढत आहेत.
शुक्रवारी वनखात्याच्या एका पथकाने सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात घोरपडींची शिकार करणाऱ्या एका प्रशिक्षित शिकाऱ्याला अटक केली आहे. श्रीराम चव्हाण असं या आरोपीचं नाव असून त्याच्यासोबत शिकारी कुत्राही होता. मोटारसायकलवरुन जात असताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आल्यामुळे त्यांनी श्रीराम चव्हाणच्या मोटारसायकलची तपासणी केली. ज्यामध्ये १३ घोरपडी आढळल्या. यापैकी १२ घोरपडी जिवंत तर एक घोरपड मृतअवस्थेत आढळली. वन-विभागाने यावेळी शिकारीसाठी वापरण्यात आलेलं साहित्याही जप्त केलं. सातारा लोणंद रस्त्यावरील वठार स्टेशन येथे घडली.
वन्यजीव संरक्षण कायद्याप्रमाणे घोरपडीला वाघा इतकाच म्हणजे उच्चतम संरक्षणाचा दर्जा आहे. पण दुर्दैवाने घोरपडी ची शिकार ही त्यांच्या मांस, रक्त व चरबी साठी केली जाते. असा दावा केला जातो की ह्या प्राण्यांच्या चरबीपासून बनवल्या जाणाऱ्या तेलाने संधिवात बरा होतो. अर्थात या दाव्याला आधुनिक औषधप्रणाली कडून कुठलाही दुजोरा मिळालेला नाही. घोरपडीची शिकार करणाऱ्या किंवा मांस विकणाऱ्या आणि विकत घेणाऱ्यांना तीन वर्ष ते सात वर्षांपर्यंतचा कारावास व रुपये दहा हजार पर्यंत दंडाची तरतूद आहे.
दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी डोंबाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चव्हाण यांनी पाळलेला शिकारी कुत्र्याला या कामासाठी विशेष ट्रेनिंग देण्यात आले होते. हा कुत्रा घोरपडीच्या लपण्याच्या ठिकाणांचा माग काढत असे व त्यानंतर शिकारी सोबतच्या पहार व टिकाव सारख्या औजारांनीर या घोरपडींना त्यांच्या अधिवासातून पकडत असत. वनखात्याचे अधिकारी आरोपीने सदरचे कृत्य मांसविक्री अथवा अन्य कोणत्या कारणाने केले आहे का याचा तपास करत आहेत.