ताडोबाच्या कोअर झोनमधील वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणाऱ्या वनाधिकाऱ्यांनी बफर झोनकडे दुर्लक्ष केल्याने तहानलेले वन्यजीव मोठय़ा संख्येने जंगलाबाहेर पडत असल्याचे एका पाहणीतून स्पष्ट झाले आहे. ताडोबा बफर झोनमध्ये अचानक उद्भवलेला मानव-वन्यप्राणी संघर्ष नियंत्रणात आणण्यासाठी वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी धावपळ सुरू केली असली तरी आजवर या प्रश्नाकडे केलेले दुर्लक्षच सध्याच्या स्थितीला कारणीभूत ठरले आहे. अलीकडच्या काही वर्षांत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर तसेच बफर झोनमध्ये वन्यप्राण्यांच्या संख्येत भरपूर वाढ झाली आहे. या प्राण्यांना पिण्यासाठी पाणी व खाण्यासाठी सावज कसे मिळेल, या मुद्दय़ाकडे वनाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे यंदा हल्ल्यांच्या संख्येत वाढ झाली, असे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे. या दाव्याच्या समर्थनार्थ समोर करण्यात आलेली आकडेवारी वनखात्याच्या हलगर्जीपणावर प्रकाश टाकणारी आहे.
ताडोबाचा कोअर झोन ६२५ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला असून, या झोनमध्ये वन्यप्राण्यासाठी ८५ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. याशिवाय ६ बोअरवेल खोदण्यात आल्या आहेत. या पाणवठय़ांमध्ये पाणी भरण्यासाठी १० हजार लिटर क्षमतेचे ४ टँकर्स २४ तास कार्यरत असतात. त्यामुळे कोअर झोनमध्ये प्राण्यासाठी भरपूर पाणी उपलब्ध आहे. त्याच्या अगदी उलट स्थिती बफर झोनमध्ये आहे. हा झोन ११०० चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेला आहे. यात नेमके किती पाणवठे आहेत याची कोणतीही माहिती वनखात्याकडे उपलब्ध नाही. बफरझोनची निर्मिती होऊन ३ वर्षे झाली तरी अधिकाऱ्यांनी ही माहिती का गोळा केली नाही, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. बफर झोनमध्ये ३५ बोअरवेल आहेत. या बोअरवेल हाताळण्यासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. एका कर्मचाऱ्याकडे ३ बोअरवेल हाताळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीच उपलब्ध होत नाही. संपूर्ण बफर झोनसाठी २ हजार लिटर क्षमतेचे केवळ ३ टँकर लावण्यात आले आहेत. यामुळे अनेक पाणवठय़ांवर पाणीच उपलब्ध नसते.
या झोनमध्ये असलेल्या मोहुर्ली क्षेत्रात सौरऊर्जेवर चालणाऱ्या चार बोअरवेल आहेत. त्यामुळे या क्षेत्रात पाणी उपलब्ध असते. इतर ठिकाणी मात्र पाण्याची बोंब असल्याने प्राण्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते व त्यातूनच हल्ले वाढले, असे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे. कोअरच्या तुलनेत बफर झोनचे जंगल जवळजवळ दुप्पट आहे. ही बाब ठाऊक असूनसुद्धा अधिकाऱ्यांनी बफर झोनकडे लक्ष न दिल्यामुळेच ही स्थिती उद्भवली आहे. वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून शासनाने या प्रकल्पाला भरपूर निधी उपलब्ध करून दिला आहे. तरीही अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे ही वेळ आली आहे.
वनखात्याचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी रविवारी येथे आले असताना भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ही पाणवठय़ाची बाब त्यांच्या लक्षात आणून दिली. परदेशी यांनी बफर झोनमध्ये किती पाणवठे आहेत, अशी विचारणा अधिकाऱ्यांना केली असता कुणालाही त्याचे उत्तर देता आले नाही. तेव्हा परदेशी यांनी ताबडतोब ही माहिती गोळा करा, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
बफर झोनमधील पाणवठय़ांकडे वन अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष
ताडोबाच्या कोअर झोनमधील वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणाऱ्या वनाधिकाऱ्यांनी बफर झोनकडे दुर्लक्ष केल्याने तहानलेले वन्यजीव मोठय़ा संख्येने जंगलाबाहेर पडत असल्याचे एका पाहणीतून स्पष्ट झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-04-2013 at 04:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest officers neglecting towards water reservoir in buffer zone