सध्या अहमदनगरसह महाराष्ट्रात सर्वत्र उन्हाचा चटका वाढला असून सूर्य आग ओकत आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदला आहे. उन्हाची दाहकता वाढल्याने नागरिकांना उष्माघाताच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावं आणि दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये असा सल्ला देण्यात आला आहे. अशा स्थितीत जंगली प्राण्याची स्थिती अत्यंत भयानक बनली आहे.
जंगली प्राण्यांना पाण्यासाठी भर उन्हात वणवण भटकावं लागत आहेत. अशात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात एका वनविभागाच्या कर्मचाऱ्याने बिबट्याच्या बछड्याला जीवदान दिलं आहे. वनकर्मचारी अशोक घुले यांनी पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या बिबट्याच्या बछड्याला पाणी पाजलं आहे. पाणी प्यायल्यानंतर बिबट्याचं पिल्लू देखील शांत झाल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं आहे. बिबट्याच्या बछड्याला पाणी पाजतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.
याबाबत अधिक माहिती देताना वन कर्मचारी अशोक घुले यांनी सांगितलं की, ज्या परिसरात बिबट्याचे बछडे आढळले त्या परिसरात वनविभागाकडून खोदकाम सुरू होतं. दरम्यान बिबट्यांच्या बछड्यांचा आवाज आला. यावेळी सतर्क झालेल्या अशोल घुले यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत आसपासचा परिसर पिंजून काढला आणि बिबट्याची आई तिथे नसल्याची खात्री केली. त्यानंतर घुले यांनी फोन करून याची माहिती वन विभागाला दिली.
वन विभागातील अधिकाऱ्यांनी संबंधित बछड्यांना पाणी पाजण्यास आणि काहीतरी खाऊ घालण्याचा सल्ला दिला. त्यानंतर घुले यांनी न घाबरता बिबट्यांच्या बछड्यांजवळ जाऊन स्वत:च्या हाताने पाणी पाजलं आहे. यावेळी घटनास्थळी वन कर्मचारी घुले यांच्यासोबत त्यांचे एकच सहकारी होते. अशा स्थितीतही त्यांनी न घाबरता बिबट्यांच्या बछड्यांना पाणी पाजलं आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.