सातारा : वाई-पाचगणी रस्त्यावर पसरणी घाट आणि इतर डोंगरांवर शहर व परिसरात वणवा लागण्याचे सत्र सुरू झाले आहे. घाटात वणवा लावण्याची मालिका सुरूच असून, त्यामध्ये दुर्मीळ वनसंपत्ती, प्राणी, पक्ष्यांचा बळी जात आहे. वन विभाग मात्र खासगी जागेत वणवा लागल्याचे कारण सांगून बघ्याची भूमिका घेत आहे. आज दुपारी पसरणी घाटात लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण करून मोठ्या प्रमाणात परिसर भस्मसात केला. दिवसभरात चार ठिकाणी वणवा पेटविण्यात आला. दिवस-रात्र धूर दृष्टीस पडत होता.

मागील काही दिवसांपूर्वी पाचगणीच्या टेबल लँडच्या पायथ्याशी लागलेल्या आगीने परिसरातील वनसंपदा भस्मसात झाली होती. आज अशाच पद्धतीने पसरणी घाटात लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण करून मोठ्या प्रमाणात परिसर भस्मसात केला. दिवसभरात चार ठिकाणी वणवा पेटविण्यात आला. दिवस-रात्र धूर दृष्टीस पडत होता. पायथ्याशी असलेल्या झाडांच्या अवतीभवती व परिसरातील वाढलेल्या व सुकलेल्या गवताची वेळीच दखल घेतली असती, तर वनसृष्टीला जीवदान मिळाले असते. आगीनंतर कित्येक हेक्टर जमिनीवरील परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला दिसत होता. त्या वणव्यात कित्येक झाडे-झुडपे आगीच्या कवेत येऊन खाक झाली. शेतकरी गैरसमजुतीतून वणवा लावत असल्याने पर्यावरण वेठीस धरण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यावर संबंधित विभागाने सखोल प्रबोधन व मार्गदर्शन करण्याची नितांत गरज असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.