वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची स्थापनेपासून १६ वर्षांत प्रथमच निवडणूक होत असून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व अॅड. यशश्री मुंडे या भगिनींनी शक्तिप्रदर्शन करीत गुरुवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उद्या (शुक्रवारी) शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हेही शक्तिप्रदर्शन करीत आपल्या गटाचे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर होत असलेल्या कारखान्याच्या निवडणुकीत मुंडे कुटुंबातील बहीण-भावाने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. गोपीनाथ मुंडे यांनी १६ वर्षांपूर्वी पांगरी (तालुका परळी) येथे वैद्यनाथ कारखान्याची उभारणी केली. केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना कारखान्याला परवानगी मिळवून घेतल्यानंतर वर्षभरात अडीच हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेचा कारखाना उभा करून अनेक विक्रम प्रस्थापित केले. स्थापनेनंतर १६ वर्षांत एका जागेचा अपवाद वगळता संचालक मंडळासाठी कधीही निवडणूक झाली नाही.
मुंडे यांचे निधन झाल्यानंतर कारखान्याची जबाबदारी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर आली. त्यांनी यंदाचा गळीत हंगाम यशस्वी केला. संचालक मंडळाची निवडणूक लागल्यामुळे मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू, राष्ट्रवादीचे नेते पंडितराव मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे मुंडे कुटुंबात कारखाना निवडणुकीपासून सत्तासंघर्ष सुरू झाला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी पंडितराव मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या देऊन कारखान्याच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. या पाश्र्वभूमीवर ग्रामविकासमंत्री मुंडे, खासदार प्रीतम मुंडे व यशश्री मुंडे या भगिनी बुधवारी परळीत दाखल झाल्या. कारखाना निवडणुकीची जोरदार मोच्रेबांधणी सुरू केली. गुरुवारी पंकजा मुंडे व यशश्री मुंडे या दोघी बहिणींनी सकाळी गोपीनाथगड येथे जाऊन दिवंगत मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अर्ज दाखल केला. या वेळी भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड, आमदार आर. टी. देशमुख, भीमराव धोंडे, संगीता ठोंबरे यांच्यासह जिल्हाभरातील भाजप पदाधिकारी, कार्यकत्रे मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा