अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. दुसरीकडे सध्या शिवसेना हा पक्ष नेमका कोणाचा? तसेच धनुष्यबाण हे निडणूक चिन्ह नेमके कोणाचे हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे गट वेगवेगळ्या योजना आखत आहे. याच योजनेचा एक भाग म्हणून शिंदे-भाजपा सरकारमधील मंत्री संजय राठोड यांना रोखण्यासाठी ठाकरे उद्धव ठाकरेंनी नवी रणनीती आखली आहे.
हेही वाचा >> अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट, भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यावर ठाकरे गटाचे गंभीर आरोप
यवतमाळमधील दिग्रसचे माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री संजय देशमुख येत्या २० ऑक्टोबर रोजी ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेपासून झाली होती. मात्र त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपा पक्षात प्रवेश केला होता. येत्या २० ऑक्टोबर रोजी ते आपल्या कार्यकर्त्यांसमवेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधणार आहेत. शिंदे गटातील नेते संजय राठोड यांना रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून आता संजय देशमुख यांना बळ दिले जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा >> नितेश राणेंच्या ‘आईसक्रीम कोन’च्या विधानावर ठाकरे गटातील महिला नेत्या आक्रमक; म्हणाल्या “तुम्ही नागरिक म्हणून…”
यवतमाळमध्ये अन्न व औषध प्रशासनमंत्री संजय राठोड यांचे मोठे राजकीय प्रस्थ आहे. मात्र त्यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरे संजय देशमुख यांना बळ देणार आहेत. संजय देशमुख हे आधीपासूनच संजय राठोड यांचे राजकीय विरोधक आहेत. त्यासाठी २० ऑक्टोबर रोजी ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर संजय देशमुख यांच्यासह उद्धव ठाकरे संजय राठोड यांच्या यवतमाळमध्ये सभा घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या राजकीय खेळीमुळे संजय राठोड यांच्याविरोधात आगामी काळात मोठे आव्हान उभे राहू शकते.